Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | first-st-bus-nagar-pune-high-way

नगर- पुणे धावली पहिली एसटी बस

divya marathi team | Update - Jun 02, 2011, 04:01 AM IST

राज्यातील पहिली एसटी बस 1 जून 1948 रोजी नगर- पुणे मार्गावर धावली. या घटनेला आज 63 वर्षे पूर्ण झाली आहेत.

 • first-st-bus-nagar-pune-high-way

  नगर - राज्यातील पहिली एसटी बस 1 जून 1948 रोजी नगर- पुणे मार्गावर धावली. या घटनेला आज 63 वर्षे पूर्ण झाली आहेत. या बसचे चालक कासम करीम शेख आज हयात नाहीत, मात्र योगायोग म्हणजे त्यांचा मुलगाही एसटीतूनच चालक म्हणून निवृत्त झाला आहे. साठीत असलेल्या इसाक शेख यांच्या हस्ते आज नगरमध्ये ‘एसटी’चा वाढदिवस साजरा करण्यात आला.

  स्वातंत्र्यानंतर सर्व खासगी बस वाहतूक करणार्‍यांचे संस्थान ‘खालसा’ होऊन एसटी महामंडळाची निळय़ा रंगाची व सोनेरी छत असलेली बस पहिल्यांदा नगर- पुणे दरम्यान धावली. माळीवाडा वेशीतून कासम करीम यांनी बॅक फोर्ड गाडीला हॅन्डल मारून बससेवेचा शुभारंभ केला. 1980 पर्यंत ‘एसटी’ हाच एकमेव पर्याय प्रवाशांकडे होता. त्यानंतर मात्र खासगी वाहतूकदारांनी स्पर्धा सुरू केली. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी एसटीनेही आपल्यात बदल घडवून आणले. तारकपूर बसस्थानकात बुधवारी (ता. 1) एसटीच्या वाढदिवसानिमित्त नगर- पुणे विनाथांबा बसची पूजा इसाक शेख यांच्या हस्ते करण्यात आली. वयाची साठी उलटलेले इसाक शेख यांना मधुमेहामुळे आपली दृष्टी गमवावी लागली. तेही वडिलांप्रमाणे एसटीतच चालक म्हणून कामाला होते. 1969 ते 2000 अशी 31 वर्षे त्यांनी सेवा केली.

  रस्ते तिथे एसटी जावी
  इसाक शेख म्हणाले की, 63 वर्षाच्या काळात अनेक बदल एसटीने पाहिले आहेत. हॅन्डलने सुरू करावयाची बॅक फोर्ड बस आता एका बटनावर सुरू होत आहे. आज एसटीची पूर्ण स्टील बॉडी झाली आहे. खिडक्यांवरील पडदे जाऊन काचा आल्या. खासगी वाहतुकीशी स्पर्धा करताना काही काळ तोट्यात अडकलेल्या एसटीची चाके आता पुन्हा नफ्याकडे धावू लागली आहेत, असेही शेख यांनी सांगितले.
  अधिकार्‍यांची पाठ
  एसटीची 63 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमास निवृत्त चालक इसाक शेख आपल्या सर्व अडीअडचणी विसरून आवर्जून उपस्थित राहिले. एसटीच्या प्रमुख अधिकार्‍यांनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. यातूनच सध्याच्या अधिकार्‍यांनी एसटीविषयी किती आपुलकी आहे हे कळून येते.

Trending