फोरेन्सिक मेडिसिन विषय / फोरेन्सिक मेडिसिन विषय वैद्यकीय अभ्यासक्रमात ठेवण्यासाठी याचिका

Jun 24,2011 02:49:37 AM IST

नागपूर- वैद्यकीय अभ्यासक्रमातून फोरेन्सिक मेडिसिन (न्यायवैद्यकशास्त्र) हा विषय वगळण्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी देताना नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व न्यायमूर्ती पी.डी. कोदे यांनी केंद्र, राज्य सरकार तसेच मेडिकल कौन्सिलला नोटीस बजावली आहे.
देशभरातील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमातून फोरेन्सिक मेडिसिन हा विषय काढून टाकण्याच्या हालचाली सुरू आहेत. या निर्णयाविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार आणि तीन प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी ही जनहित याचिका दाखल केली होती. मेडिकल कौन्सिल वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमातून हा विषय काढून टाकण्याच्या तयारीत आहे. तसे झाल्यास फौजदारी खटल्याच्या सुनावणीवरही परिणाम होईल, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. फोरेन्सिक मेडिसिन विभागाचा अहवाल न्यायालयीन प्रकरणांत महत्त्वपूर्ण मानला जातो. याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही होऊ शकतो. १५ मे रोजी मेडिकल कौन्सिलने बोर्ड आॅफ गव्हर्नन्सची स्थापना केली आहे. बोर्डाच्या शिफारशीनंतरच मेडिकल कौन्सिल हा विषय वगळत असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. कौन्सिलने आपला निर्णय माघारी घ्यावा, अन्यथा सुनावणी पूर्ण होईपर्यंत स्थगिती द्यावी, अशी मागणी वडपल्लीवार यांनी केली आहे.

गुन्ह्यांचा आलेख वाढता
२००८च्या तुलनेत २००९ मध्ये गुन्ह्यांची संख्या ३.७६ टक्क्यांनी वाढली आहे. दरवर्षी गुन्ह्यांच्या संख्येत भर पडत आहे. त्यामुळे ‘फोरेन्सिक मेडिसिन’ हा विषय अभ्यासक्रम राहिला पाहिजे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

X