शून्य भारनियमनासाठी आता / शून्य भारनियमनासाठी आता जादा पैसे नको

divya marathi team

Jun 01,2011 03:53:57 AM IST

नागपूर - सध्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून या महागाईच्या काळात एक आनंदाची बातमी आहे. महावितरणने शून्य भारनियमनासाठी लावण्यात येणार्‍या अतिरिक्त शुल्कात जुलै महिन्यापासून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महागाईच्या चक्रव्यूहात भरडत जाणार्‍या वीज ग्राहकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळेल.
राज्यातील महावितरणच्या सर्व मुख्यालयांत या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे शून्य भारनियमन काळात लावण्यात येणारे अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. या निर्णयानंतर विदर्भातील नागपूर, अमरावती, नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद येथील ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मते याबाबत महाराष्ट्र नियामक आयोगाला सूचना देण्यात आल्या आहेत. मागणी आणि पुरवठा यांचे योग्य प्रकारे नियोजन केल्यामुळे आणि दाभोळ, जिंदाल, महाजेनकोमधून अतिरिक्त वीज उपलब्ध होत असल्यामुळे आता पूर्वीसारखी परिस्थिती नसल्याचे महावितरणच्या अधिकार्‍यांनी सांगितले. सध्या राज्यात 2500 ते 4000 मेगाव्ॉटचा तुटवडा असून तो सहज पूर्ण होऊ शकतो. शून्य भारनियमनाचा निर्णय दोन महिन्यांपूर्वीदेखील शक्य होता. मात्र परराज्यातून वीज घेण्याचा करार जून महिन्यापर्यंत करण्यात आला आहे. यामुळे हा निर्णय जुलै महिन्यापासून अमलात येईल. सध्या महाजेनकोच्या खापरखेडा विद्युत केंद्रामध्ये 500 मेगाव्ॉट वीज तयार करण्यात येणार आहे. शून्य भारनियमनासाठी आता परराज्यातून वीज घेण्याची गरज नसल्याचे महावितरणच्या अधिकार्‍यांनी सांगितले. गेल्यावर्षी औरंगाबादसह काही महानगरात शून्य भारनियमन सुरू करण्याच्या नावाखाली जादा अधिभार लावण्यात आला होता.

X
COMMENT