पाच महिन्यांपासून वेतन / पाच महिन्यांपासून वेतन नसल्याने कर्मचारी रस्त्यावर

Jun 20,2011 04:23:57 PM IST

अकोला - पाच महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आल्याने अकोला महापालिकेतील कर्मचार्‍यांनी गेल्या नऊ दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे शहराला अक्षरश: गटाराचे स्वरूप आले आहे. शहराला निर्जळीलाही तोंड द्यावे लागत आहे. कर्मचार्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याऐवजी सत्ताधारी व विरोधी राजकीय पक्ष मात्र एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचाच प्रयत्न करत असल्याचे दिसून येते.
1 ऑक्टोबर 2001 रोजी महापालिकेत रूपांतर झालेली अकोला पालिका सुरुवातीपासूनच अनेक कारणांनी चर्चेचा विषय ठरली आहे. सद्य:स्थितीत या पालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आहे व राज्यातही काँग्रेस आघाडीचे सरकार असतानाही येथील सत्ताधारी आपल्याच पक्षाकडून या पालिकेला मदत मिळवू शकत नाहीत, हे मोठे अपयशच आहे. विरोधी पक्षही केवळ आपल्या स्वार्थासाठी सत्ताधारी पक्षांशी हातमिळवणी करून आपला वाटा मिळविण्यासाठी तडफडत असल्याचे दिसते. जनतेच्या व कर्मचार्‍यांच्या समस्यांशी या दोन्ही घटकांना काहीही देणेघेणे नसल्याचेच आजवर दिसून आले आहे.
वसुलीची गती मंदावल्याने पालिकेच्या तिजोरीत सध्या खडखडाट आहे. परिणामी गेल्या पाच महिन्यांपासून येथील कर्मचार्‍यांना वेतन मिळालेले नाही. वेतन मिळत नसल्याने पालिकेतील सुमारे अडीच हजार कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. याच्या निषेधार्थ कर्मचारी आता रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या नऊ दिवसांपासून कर्मचार्‍यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारल्याने शहरातील सर्व व्यवस्था कोलमडली असल्याचेच दिसून येते. आंदोलनामुळे गेल्या नऊ दिवसांपासून शहराची साफसफाई ठप्प झाली आहे, तसेच पथदिवे दिवसा चालू तर रात्री बंद राहतात. तसेच आरोग्य विभाग, अग्निशामक दल यासारख्या अत्यावश्यक सुविधाही अक्षरश: ठप्प झाल्याने त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.X