नागपूरात पोलिसांची दंडूकेशाही, / नागपूरात पोलिसांची दंडूकेशाही, युवक-युवतीकडून उकळले पाच हजार रुपये

Jun 20,2011 01:51:30 PM IST

नागपूर - महाराजबाग परिसरात रविवारी पोलिसांची दंडुकेशीही पहायला मिळाली. आपसात गप्पागोष्टी करणा-या युवक-युवतीला पोलिस कॉन्सेटबलने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुटकेसाठी ५ हजार रुपयांची लाच घेतली. मात्र जेव्हा पोलिस कॉन्स्टेबलला कळले की त्याने एका पोलिस उपनिरीक्षकाच्या मुलीकडून लाच स्विकारली तेव्हा त्याने त्यांची माफी मागत पैसे परत केले. मात्र यासगळ्या प्रकारात त्या मुलीला स्टाफ सलेक्शच्या परीक्षेला मुकावे लागले.

नेमके काय घडले

यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील एका प्रतिष्ठित कुटूंबातील युवक इंडिका कारने सकाळी नागपूर मध्ये आला. त्याच्या कारमध्ये त्याचा एक मित्र आणि दोन युवती होत्या. त्यातील एक युवती धंतोलीच्या कॉलेजमध्ये परीक्षा देण्यासाठी निघून गेली. दुसरीची परीक्षा दूपारी दोन वाजता दूस-या एका परीक्षा केंद्रावर होती. त्यामुळे परीक्षेच्या वेळेपर्यंत हे दोघे महाराजबाग परिसरात फिरू लागले. दुपारी १२.३० वाजता एका पोलिस कॉन्स्टेबलने त्यांना पकडले आणि पोलिस स्टेशनमध्ये घेऊन गेला. या दोघांनी महाराजबाग परिसरात मोबाईलमध्ये काही फोटो काढले होते, ते फोटो त्यांना दाखवत पोलिसाने त्यांना सार्वजनिक ठिकाणी अश्लिलचाळे केल्याच्या आरोपात पकडल्याचे सांगितले. हे फोटो तुमच्या कुटूंबियांना दाखवण्यात येईल असे पोलिसाने त्यांना सुनावले. तेव्हा या दोघांनी आम्ही केवळ फिरण्यासाटी महाराजबागेत आलो असल्याचे सांगितले. युवतीने तिच्या परीक्षेचे प्रवेशपत्रही पोलिसांना दाखविले मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

सुटकेसाठी १० हजारांची मागणी

या युवक-युवतीला नंतर काचीपूरा पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले. तिथे त्यांच्याकडे सुटकेसाठी १० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. तेव्हा दोघांनी मिळून पोलिस कॉन्स्टेबलला ५ हजार रुपये देऊन स्वत:ची सुटका करुन घेतली. मात्र युवक युवतीने दुपारी १.३० वाजता आपल्या परिचितांसह सिताबर्डी पोलिस स्टेशन गाठले आणि 'त्या' कॉन्स्टेबलविरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केली. त्यावेळी हजर असलेल्या पोलिस अधिका-याने सर्व कॉन्स्टेबलला समोर बोलावले. आपण फसलो असल्याचे लक्षात आल्यावर 'त्या' पोलिसाने पैसे परत करण्यासोबतच आणखीही पैसे देण्याची तयारी दर्शवली. 'त्या' पोलिसाविरोधात या अगोदरही अनेक गंभीर आरोप लावले गेले आहेत. जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यावर असतांना त्याच्या विरुध्द गंभीर आरोप करण्यात आले होते.

दरम्यान वरिष्ठ अधिका-यांनी युवक-युवतीला त्यांचे पैसे परत केले. मोबाईलमधील फोटोही डिलिट करण्यात आले. त्यांनीही बदनामीच्या भीतीने 'त्या' पोलिसाविरोधात तक्रार दाखल केली नाही. मात्र पोलिस उपनिरीक्षकाची मुलगी 'त्या' पोलिसाला शिव्याशाप देतच पोलिस स्टेशन बाहेर पडली.

X