दहा लाख देता / दहा लाख देता की मारू उडी? पाऊणशे वर्षांच्या आजोबांची वीरूगिरी

दिव्य मराठी न्यूज नेटवर्क

Jun 10,2011 03:40:23 AM IST

नागपूर- पैशासाठी माणसे काय करतील काही सांगता येत नाही. १० लाख रुपये मिळावेत यासाठी पुसद (जि. यवतमाळ) तालुक्यातील ७५ वर्षांच्या आजोबांनी विजेच्या टॉवरवर चढून चक्क वीरूगिरी केली. पाच तासांच्या अंगमेहनतीनंतर त्याला टॉवरवरून खाली उतरविण्यास पोलिसांना अखेर यश आले. त्याला दहा लाख रुपये तर मिळाले नाहीत, पण फुकटचा तुरुंगवास मात्र घडला.

पुसद तालुक्यातील काकडदाती गावात सीताराम भाकरे हे ७५ वर्षांचे गृहस्थ सकाळी आठच्या सुमारास गावाजवळील विजेच्या उंच टॉवरवर चढले. वर टोकाला जाऊन त्यांनी आरडाओरड सुरू केली. हा प्रकार लक्षात येताच ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या अधिका-यांना त्याची माहिती दिली. कंपनीच्या अधिका-यांनी धावपळ करून टॉवरचा वीजप्रवाह खंडित केला. त्यानंतर त्या आजोबांना खाली उतरविण्याची कसरत सुरू झाली. खाली उतरण्यासाठी आजोबांनी घातलेली अटही मोठी मजेदार होती. मला दहा लाख रुपये द्या, नाही तर मी खाली उडी मारून जीव देतो, अशी धमकी त्यांनी दिली. आपल्या घरी मुलाकडे नगदी दहा लाख रुपये पोहोचते करा, तरच मी खाली उतरतो, असे सीतारामबुवा ओरडून सांगत होते. दोन तास त्यांचे हे धमकी नाट्य सुरू होते. त्यामुळे टॉवरखाली बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. उडी मारली तर त्यांना इजा होऊ नये यासाठी खाली ताडपत्री बांधण्यात आली होती.

अखेरीस पोलिस अधिकारी अरुण त्रिपाठी यांनी टॉवरजवळ जाऊन सीतारामची समजूत काढली. पाच तासांच्या परिश्रमानंतर दुपारी एकच्या सुमारास सीतारामला कमरेला दोरी बांधून खाली उतरविण्यात आले. पोलिसांनी अटक करून त्याला तुरुंगात टाकले.

X
COMMENT