रत्नागिरीत मच्छीमारांसाठी धोक्याचा / रत्नागिरीत मच्छीमारांसाठी धोक्याचा तिसरा बावटा

divya marathi team

Jun 05,2011 05:55:42 PM IST

रत्नागिरी - जिल्ह्यात सलग तिस-या दिवशी वादळी वा-यासाह पावसाची रिपरिप सुरु आहे. पावसामुळे तीन दिवसात घरे व दुकानांचे दोन लाखांचे नकसान झाले आहे. तर किनारपट्टीवर ताशी 45 ते 50 कि.मी. वेगाने वादळी वारे सक्रीय झाल्यामुळे किनारपट्टीवर तीन नंबरचा धोक्याचा बावटा लावण्यात आला आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या चार ते पाच वर्षातील हवामानाच्या अंदाजापेक्षा कोकणात यावर्षी मान्सुनपुर्व पावसाला लवकर सुरवात झाली आहे. या पावसाचा सर्वाधिक तडाखा हा दक्षिण रत्नागिरीतील तालुक्यांना बसला आहे. संगमेश्वरसह राजापूर तालुक्यात वादळी वा-यासह पावसाने थैमान घातले आहे.

आज सकाळी 8.30 पर्यंतच्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 32.1 मिमी पावसाची नोंद झाली. तर दोन लाखांचे नुकसान झाले आहे. राजापूर तालुक्यात दुपारी रस्त्यावर काम करणा-या कामगारांच्या झोपडीवर झाडाची फांदी कोसळून तीनजण जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 48 तासात जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच जयगड ते गोवा किनारपट्टीवर ताशी 45 ते 50 किमी वेगाने वादळी वारे सक्रीय झाले आहेत. किनारपट्टीवर तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असाही इशारा देण्यात आला आहे. मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता असून किनारी भागातील नागरिकांनी, मच्छीमार संस्थानी व मच्छीमारांनी सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

X
COMMENT