महिलांना लुटणारी महिलांची / महिलांना लुटणारी महिलांची टोळी ठाण्यात जेरबंद

Jun 09,2011 01:56:37 AM IST

ठाणे- बाजारात खरेदीसाठी गेलेल्या महिलांकडील पर्स, दागिने लहान मुलांच्या मदतीने हातोहात लंपास करणा-या महिलांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून महिलांच्या पर्स, ३८ मोबाइल, दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, त्यांच्यापैकी आणखी चार जणी अजूनही फरारी आहेत. अटक करण्यात आलेल्या चार महिला आरोपींना न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी सुनावली.

वंदना ऊर्फ दीपाली सुगनचंद डिंगा (३२, रा. भांडूप) आणि रजनी रामचंद्र महाडिक (४५, रा. दिवा) या दोघी बहिणींसह त्यांची वहिनी संगीता विजय काते (३६) व रजनीची मुलगी श्वेता प्रमोद गोवालकर (२३) अशा चौघींना पोलिसांनी अटक केली आहे. वंदना हिला काही दिवसांपूर्वी ठाण्याच्या स्टेशन रोडवरील बाजारपेठेत ताब्यात घेतले होते. तिच्याकडून माहिती मिळाल्यानंतर इतर तिघींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून ११० पर्स, ३८ मोबाइल, ६ घड्याळे, ११ तोळ्यांचे सोन्याचे तर ४५० ग्रॅम चांदीचे दागिने आणि रोख २० हजार रुपये असा सुमारे साडेचार लाखांचा ऐवज जप्त केला. गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या पर्स किंवा दागिन्यांवर हात मारणा-या या महिला चोरी करण्यासाठी चक्क लहान मुलांचाही वापर करायच्या. मुलांना कडेवर घेऊन महिलांचे लक्ष वेधण्यासाठी त्याला रडविण्याचे नाटक करायच्या आणि महिलांचे लक्ष विचलित झाले की आपला कार्यभाग साधायचा. विशेष म्हणजे चोरीतून जमा झालेली रक्कम या महिला व्याजाने देत असल्याची माहितीही उजेडात आली आहे.

X