सरकार म्हणते, ४५ / सरकार म्हणते, ४५ रुपयांत शिवा शाळांचे गणवेश

Jun 29,2011 05:19:17 AM IST

अकोला - सोमवारपासून जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांना सुरुवात झाली आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी अनेक पालकांनी मुलांच्या पाटी-पुस्तकाची तयारी केली. ज्या वस्तू शासनाकडून मिळणार त्या घेण्याचे बहुतेकांनी टाळले. शाळा सुरू झाल्यानंतर मोफत गणवेशाची विचारणा अनेकांनी शालेय प्रशासनाकडे केली खरी; परंतु त्याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे अद्याप धूळ खात पडल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे सरकारने गणवेशासाठी केवळ ४५ रुपयांची तरतूद केल्याचे उजेडात आले आहे.

जून महिना उजाडताच शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी दुकानात रांगा लावल्या होत्या. खासगी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आवश्यक ते सर्व साहित्य खरेदी केले. मात्र, सरकारी अथवा महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी मोफत गणवेश शाळेत मिळेल म्हणून उर्वरित खरेदी पार पाडली. मात्र, शाळा उघडल्यानंतर पालक-विद्यार्थ्यांनी त्याबाबतची विचारणा शाळा प्रशासनाकडे केली असता अद्याप गणवेश आले नसल्याचे उत्तर देण्यात आले. गेल्या दीड महिन्यापूर्वीच शाळांनी सरकारकडे कापडाची मागणी केली होती. शाळा सुरू होताच प्रत्येक विद्यार्थ्याला गणवेश मिळेल, असे त्यामागचे नियोजन होते. मात्र, सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे उघड झाले आहे.
अकोला महापालिकेच्या ६१ शाळांमधील १२ हजार ५९० विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी पालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्याने सरकारकडे कापडाची मागणी केली होती. यानुसार खाकी हाफ पॅन्टसाठी १ हजार १७४.६० मीटर, पांढºया शर्टसाठी २ हजार २८६.०२ मीटर तर विद्यार्थिनींसाठी निळ्या रंगाच्या स्कर्टसाठी ६ हजार ५९३.०२ मीटर तसेच पांढऱ्या टॉपसाठी ८ हजार १२२.९४ मीटर कापडाची मागणी होती. मुंबईच्या यंत्रमाग महामंडळाकडून हे कापड येणार होते.

स्वस्त गणवेशाचा दर्जा काय?
विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्यापूर्वी गणवेश शिवून मिळावा यासाठी विभागीय आयुक्तांनी दीड महिन्यापूर्वीच कापडाची मागणी केली होती, परंतु अद्याप ही मागणी धूळ खात पडून आहे. सरकारने दोन विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी ४०० रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये ९० रुपये शिलाईसाठी तर ३१० रुपये कापडासाठी देण्यात आले. एका विद्यार्थ्यासाठीची हीच तरतूद १५५ रुपयांचे कापड व शिलाईसाठी केवळ ४५ रुपये दिल्याचे स्पष्ट होते. या पैशातून शिवलेल्या गणवेशाचा दर्जा काय असेल याची कल्पना केलेलीच बरी, अशा प्रतिक्रिया पालकांमधून व्यक्त होत आहेत.

X