आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याने घेतली / आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याने घेतली शिक्षकाची सुपारी

Jun 29,2011 05:09:48 AM IST

गोंदिया - आश्रमशाळेतील एका चौदावर्षीय विद्यार्थ्याने एका चक्क आपल्या शिक्षकालाच ठार करण्याची सुपारी घेतल्याची व संबंधित शिक्षकावर कुऱ्हाडीने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नुकतीच गोंदिया जिल्ह्यातील धाबेपवनी येथे उघडकीस आली. या प्रकरणी संबंधित विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धाबेपवनी येथील विवेकानंद आश्रम शाळेत कैलास खुणे हे नोकरीला आहेत. शाळेपासूनच जवळच ते राहतात. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका विद्यार्थ्याने खुणे यांचे दार ठोठावले. खुणे यांनी दरवाजा उघडला असता, दारात उभ्या असणाऱ्या त्यांच्याच विद्यार्थ्याने खुणे यांच्यावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच सावध झालेल्या खुणे हे दाने पावले मागे सरकल्याने ते बचावले. खुणे यांनी तातडीने संबंधित विद्यार्थ्याला पकडले व त्याच्या हातातील कुऱ्हाड ताब्यात घेतली. तसेच आरडाओरड केली, त्यामुळे त्यांचे शेजारी धावतपळत आले. या सर्वांनी संबंधित विद्यार्थ्याकडे चौकशी केली असता आपल्याच शाळेतील एका शिक्षकाने खुणे यांना संपविण्यासाठी आपल्या दहा हजार रुपये देऊ केले होते, अशी माहिती उजेडात आली. नवेगावबांध पोलिसांत संबंधित विद्यार्थ्याविरुद्ध तक्रार देण्यात आली.

X