आर्थिक विवंचना : / आर्थिक विवंचना : हताश शिपायाची आत्महत्या

प्रतिनिधी

Jun 23,2011 06:34:01 AM IST

अकोला: पाच महिन्यांपासून पगार नाही, आंदोलन करूनही तिढा सुटेना. घरातील चूल पेटण्याचे वांधे झाले असताना मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज फेडणार कसे, या विवंचनेत असलेल्या अकोला महानगरपालिकेतील एका चतुर्थ श्रेणी कर्मचा-याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली.
अकोला महानगरपालिकेच्या कर्मचा-यांचे पगार गेल्या पाच महिन्यांपासून थकले आहेत. मागील 12 दिवसांपासून या कर्मचाºयांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनानंतरही थकीत वेतनाचा तिढा न सुटल्याने अनेक कर्मचा-यांची चूल पेटणेही अशक्य झाले आहे. आंदोलनाच्या बाराव्या दिवशी एका कर्मचा-याने मृत्यूला जवळ करीत जगण्याची सुरू असलेली परवड थांबवली.
महापालिकेत चतुर्थश्रेणी कर्मचारी असलेले दत्तात्रय वानखेडे पाच हजार रुपये पगारावर काम करत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मुलीचे लग्न झाले. उधार- उसनवारी करून वानखेडे यांनी मुलीचे हात पिवळे केले. पाचवा वेतन आयोग व थकित वेतनाची रक्कम मिळताच ही देणी देऊन टाकू, असे त्यांचे नियोजन होते. अपु-या पगारात घर चालवणे अवघड जात असल्याने ते रात्रपाळीत वॉचमनचेही काम करायचे. त्यातच गेल्या पाच महिन्यांपासून महानगरपालिका कर्मचा-यांचे पगार थकल्याने त्यांची अवस्था आणखीच बिकट झाली होती. याच वैफल्यातून वानखेडे यांनी आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, पालिका कर्मचा-यांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

X
COMMENT