नव्या औद्योगिक धोरणार / नव्या औद्योगिक धोरणार विदर्भातील उद्योगांना विशेष सवलत मिळणार - राणे

टीम दिव्य मराठी

Jun 12,2011 12:56:55 PM IST

नागपूर - विदर्भात उद्योगांचा विकास होण्यासाठी येथे येणा-या उद्योगांना विशेष सवलत देणार असल्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र राज्य पुन्हा एकदा औद्योगिक क्षेत्रात क्रमांक एकवर येण्यासाठी नवे औद्योगिक धोरण तयार केले जात असून ते येत्या अधिवेशनात सादर होणार असल्याचेही उद्योगमंत्री राणे यांनी सांगितले आहे.

शनिवारी नागपूरात राणे यांनी राज्याच्या नव्या औद्योगिक धोरणासंदर्भात उद्योजकांसोबत चर्चा केली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राणे म्हणाले, विदर्भ, मराठवाडा, कोकण या मागास भागात उद्योग यावेत ही शासनाची भूमिका आहे. त्यासाठी नव्या उद्योगांना कशाप्रकारे मदत करता येईल या दृष्टीने औद्योगिक धोरणात विचार केला जाणार आहे. तसेच नक्षलग्रस्त गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणते उद्योग उभारले जावे यासाठी उद्योजकांनी काही सुचना केल्या.

एमआयडीसीत बंद पडलेल्या कारखान्यांना कशा प्रकारे मदत करता येईल याचाही विचार केला जाणार असल्याचे राणे यांनी यावेळी सांगितले. तसेच कोकणाला 720 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. त्याचा योग्य उपयोग करण्यात येईल, मात्र वीज प्रकल्प किती उभारले जावे हे गरज पाहून ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.X
COMMENT