आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राममंदिर उभारण्यासाठी कटिबद्ध : राजनाथसिंह

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


कुंभनगर - अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी सरकारने सहा महिन्यांत कायदा करावा. सरकार मंदिर उभारण्यात अयशस्वी ठरले तर साधू-संत तीव्र आंदोलन करतील, असा इशारा विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) दिला आहे. हा निर्णय बुधवारी विहिंपच्या केंद्रीय मार्गदर्शक मंडळाच्या बैठकीत झाला. बैठकीत भाजपचे राष्‍ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह हेही उपस्थित होते. भाजप मंदिर उभारण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गोरक्षपीठाचे पीठाधिपती महंत अवैद्यनाथ हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. विहिंप अध्यक्ष अशोक सिंघल म्हणाले की, सरकारने मंदिर उभारण्यासाठी संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात कायदा न केल्यास साधू-संत पुन्हा ताकद दाखवतील आणि ती निर्णायक लढाई असेल. विहिंपच्या बैठकीत सिंह यांच्यासह उत्तर प्रदेश अध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी उपस्थित होते. गुरुवारी विहिंपचे संतसंमेलन होणार असून त्यात मोठा निर्णय अपेक्षित आहे.

आंदोलनास भाग पाडू नका
केंद्र सरकारने साधू-संतांना आंदोलन करण्यास भाग पाडू नये. लोक राममंदिरासाठी बलिदान करण्यास तयार आहेत. स्वातंत्र्य आंदोलनासारखे मंदिर आंदोलनही संथ झालेले नाही. 11 एप्रिल ते 13 मेपर्यंत विजय महामंत्र आंदोलन होईल. अयोध्येतील कार्यशाळेत ठेवण्यात आलेल्या शिळांपासूनच मंदिर बनेल.

बैठकीतील इतर मुद्दे
*देशभरात गोहत्या बंदी व धर्मांतर बंद करा
*गंगा नदी प्रदूषणमुक्त करावी
*तुरुंगात बंद असलेल्या संतांना मुक्त करा
*वेदपुराणांचे संरक्षण करा
*अयोध्येतील जागेची वाटणी बदलली जावी
*जातीच्या आधारे सुविधा देणे बंद करा

स्नान, आशीर्वादासाठी आलो : राजनाथ
विहिंप बैठकीनंतर भाजप अध्यक्ष राजनाथसिंह यांनी सांगितले की पक्ष राममंदिराच्या मुद्द्यापासून कधीच मागे हटलेला नाही. यापुढेही त्यासाठी कटिबद्ध आहे. कुंभमेळ्याबाबत येण्याविषयी विचारले असता ते म्हणाले, आपण तर केवळ स्नान करून संतांचे आशीर्वाद घेण्यासाठी कुंभमेळ्यात आलो होतो. यामागे कुठलाही राजकीय उद्देश नव्हता.