आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फाइव्ह स्टार बनला कुंभमेळा, कॉटेजचे भाडे 35 हजार रूपये रोज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलाहाबाद- चारशे चौरस फुटांचा खास डिझाइन केलेला तंबू. आत एकदम नवे फर्निचर. गालिचा. टीव्ही. शाही ड्रेसिंग सेट. फोन. वूडन फ्लोअर. अटॅच वॉशरूम. एका विस्तीर्ण तंबूत शानदार डायनिंग हॉल. पहाटे योगाभ्यास. दुपारी संगमावर नौकाविहार. भारतीय परंपरेची झलक दाखवण्यासाठी सायंकाळी हवन. वेदांत चर्चा. भजन. योग, ज्योतिष आणि आयुर्वेदतज्ज्ञांची सेवा. अलाहाबाद, लखनऊ आणि वाराणसी विमानतळावर पाहुण्यांचे स्वागत व निरोप.


कुंभमेळ्यात अशी आलिशान व्यवस्था पहिल्यांदाच दिसून आली. तीन दर्जाचे सहा हजारांपासून ते 35 हजार रुपये रोज भाडे असलेले सुमारे बारा निवासी तंबू ही कुंभमेळ्याची नवी ओळख आहे. संकेतस्थळांद्वारे गेल्या दीड वर्षापासून जबरदस्त मार्केटिंग. यातील काही तंबू जवळपासच्या खासगी जमिनींवर उभारले आहेत, तर काही साधू-संतांना मिळालेल्या मोफत जमिनींवर. गंगेपलीकडे समुद्रकूप आश्रमात सरसोच्या शेतावर सर्वात भव्य 50 लक्ष्मी कुटीर दिल्लीच्या आर्किटेक्टने डिझाइन केले आहेत. अजमेरहून फर्निचर व तंबू आणले. बिहारमध्ये गयेजवळ टिकारी राजघराण्यातील लक्ष्मी सिंह यांनी सुमारे सहा कंपन्यांशी भागीदारीत हा व्यावसायिक आरंभ केला. सर्व कुटीर पॅक आहेत. त्या म्हणाल्या की, ‘परदेशी पर्यटक कुंभमेळ्यात येतातच. त्यांना सुविधा हव्या असतात. अनोखी बाब म्हणजे भारतीय भाविकांनीही या भव्य वसाहतींमध्ये रस घेतला. बुकिंग करणा-यांमध्ये 40 टक्के भारतीय आहेत.’

ज्या स्थानिक व्यापा-यांच्या जमिनी कुंभमेळ्याच्या परिसरात आहेत ते सर्वात जास्त नशीबवान ठरले. हवाई दलातून निवृत्त झालेले शशिकांत मिश्र यांनी संगमापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर अरैलमध्ये आपल्या 12 बिघे जमिनीवर आठशे पाहुण्यांसाठी जर्मन तंत्राने वॉटरप्रूफ आणि फायरप्रूफ कॉटेजेसची लांबलचक रांग उभारली. मौनी अमावास्येच्या सर्वात महत्त्वाच्या स्नानाप्रसंगी वाढती मागणी पाहून आणखी शंभर लोकांच्या मुक्कामाची व्यवस्था करावी लागली. इंटरनेट, टीव्ही, भोजन व एसी कारसह डबल बेडचे सुपर डिलक्स कॉटेज 18 हजार रुपये रोज. त्यांच्याकडे 70 टक्के भारतीय आले. बहुतांश बुकिंग ऑनलाइन झाली.


कुंभ कॉटेज, कुंभ व्हिलेज, मैत्रेयी वैदिक व्हिलेज, प्रयाग हेरिटेज, लक्ष्मी कुटीर आणि महाकुंभ फेस्टिव्हल यांनी संकेतस्थळांवरून वर्षभरापूर्वीच मार्केटिंग सुरू केले होते. प्रयाग हेरिटेजला पहिली बुकिंग गेल्या वर्षी जानेवारीतच मिळाली होती. ते होते अमेरिकेतील थॉमस रॉथ की. इतर देशांकडून ऑनलाइन चौकशी सुरू झाली तेव्हा सर्वांनीच कान टवकारले. ऑक्टोबर 2012 पासूनच कॉटेज उभारायला सुरुवात झाली. ज्येष्ठ वकील चंद्रशील द्विवेदी म्हणाले की, या व्यावसायिकांनी ‘अतिथि देवो भव’ची परंपराच डॉलर व पौंडांमध्ये ऑनलाइन करून टाकली.


वाट्टेल त्या किमतीत सुविधा पुरवण्याच्या मागणीमुळे पुरोहितांवरही दडपण वाढले. काहींनी पारंपरिक स्वस्त तंबूंऐवजी सोयी-सुविधांनी सज्ज कॉटेज बनवले. तीर्थ पुरोहित राहुल शर्मा यांनी सांगितले की, त्यांनी 300 पाहुण्यांसाठी व्यवस्था केली. डबल बेडचे स्वीस कॉटेज सहा हजार रुपयांत. 10-12 सदस्यांसाठी फॅमिली कॉटेज 40 हजार रुपयांत. पुरोहित या नात्याने त्यांनी परंपरेचेही भान राखले. त्यामुळे इंटरनेट व टीव्ही बसवला नाही. त्यांच्याकडे 80 टक्के भारतीय आहेत.