आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 89th Marathi Literary Meet At Pimpri Chinchwad, Pune

स्त्रियांची वास्तव प्रतिमा दाखवण्यात माध्यमे असमर्थ- महिला परिसंवादात खंत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्यानबा तुकाराम साहित्यनगरी, पिंपरी-चिंचवड- महिलांची वास्तव प्रतिमा दाखविण्यात माध्यमे असमर्थ ठरत असून, तिला वस्तू म्हणून सादर करण्यातच धन्यता मानली जात असल्याची खंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील परिसंवादत शनिवारी व्यक्त करण्यात आली.
संमेलनात आयोजित करण्यात आलेल्या ‘माध्यमातील स्त्री-प्रतिमा आणि भारतीय संस्कृती’या परिसंवादात सरिता कौशिक, जयु भाटकर, गुरय्या स्वामी, अमृता मोरे व डॉ. अनिरूद्ध मोरे आदींना सहभाग नोंदवला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार राही भिडे होत्या.
भिडे म्हणाल्या, माध्यमातील स्त्री व्यक्तिरेखा वा प्रतिमा योग्य नाही. माध्यमे जे दाखवितात, त्याची प्रतिक्रिया समाजात उमटते असते. त्यामुळे लोकांनी काय बघावे, ही माध्यमांचीच जबाबदारी आहे. पत्रकार असलेल्या स्त्रियांनादेखील महिलांचे प्रश्न मांडावे, असे वाटतच नाही. कारण, काय दाखवायचे, या निर्णय प्रक्रियेत महिला नसतात. त्यामुळे महत्त्वाच्या पदावर स्त्रियांना निर्णय प्रक्रियेत सामावून घ्यायला हवे. याव्यतिरिक्त स्त्रियांनी स्वतःला विशिष्ट कुंपणात बांधून घेतले आहे. त्यातून त्या बाहेरच पडत नाही. श्रीमंत व उच्चजातीच्या महिलांची समस्या चंगळवादी आहे आणि माध्यमे यातच घुटमळत आहेत. स्त्री शक्तीस्वरूप असून, त्यांची खरी ओळखच माध्यमांनी दाखविण्याचा प्रयत्न करावा. तेव्हाच समाजातील लोकांची मानसिकता बदलेल.
कौशिक म्हणाल्या, जाहिरातीत स्त्रियांचा एक वस्तू म्हणून वापर केला जातो. वस्तू विकण्यासाठी तिला अधिक सुंदर व भडक दाखविले जाते. बंधने किती हवी, हे आपणच ठरविण्याची गरज आहे. मोरे म्हणाल्या, माध्यमांमध्ये जी स्त्री प्रतिमा दाखविली जाते, ते खरे स्वरूप नाही. जाहिरात किंवा मार्केटींगमध्ये स्त्री प्रतिमा भरडली जाते.
स्वामी म्हणाले, वैदिक काळात महिलांना बरोबरीचे स्थान होते. मात्र, मनुस्मृतीने त्यांचे हक्क नाकारले. ती केवळ मनुष्य नसून, एक देवताही आहे. याचे भान लोकांनी व माध्यमांनी विसरायला नको. खेदाची बाब म्हणजे महाराष्ट्रात एकदाही महिला मुख्यमंत्री झाली नाही.
भाटकर म्हणाले, स्त्री आता घरातील पुंपणापुरती मर्यादित आहे. या चौकटीचा चष्मा बदलणे ही काळाची गरज आहे. माध्यमांनी सास व बहूपुरते महिलांचे विचार न करता सकारात्मकताही दाखवावी.
डॉ. मोरे म्हणाले, ज्ञान-विज्ञानाच्या काळात माध्यमांनी आपल्याला समाज कोठे घेऊन जायचा आहे, हे ठरवावे. पिढ्यानपिढ्या स्त्रियांवर अत्याचार होत आहेत आणि ते आजही कायम आहेत. तोंडाला स्कार्प बांधून पीडित महिलेची मुलाखत घेतली जाते. पण महिलेवर अत्याचारच होऊ नये, अशी दृश्ये माध्यमे कधी दाखवतील, असा सवालही त्यांनी केला.