आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 89th Marathi Literary Meet At Pimpri Chinchwad, Shripal Sabnis

माझी मायमराठी समृद्ध व श्रीमंत भाषा- डॉ. श्रीपाल सबनीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्यानबा तुकाराम साहित्यनगरी, पिंपरी-चिंचवड- माझी मायमराठी समृद्ध व श्रीमंत भाषा आहे पण मराठी माणूस गरीब आहे. अभिजनवर्गापासून, बहुजन, श्रमिक, आदिवासी व बसवेश्वराची मराठी हीच सर्वां मराठी आहे. आज संमेलनातील भव्य दिव्य मंडप पाहून या संमेलनाचे आयोजन करणा-या स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील आणि संमेलनाचे समन्वयक सचिन इटकर यांचा मला अभिमान वाटतो. संमेलनाच्या इतिहासात संमेलनाध्यक्षाची ही पहिलीच मुलाखत असून मुलाखतकार आणि दाद देणारे रसिकही यात पहिल्यांदाच सहभागी झाले आहेत, अशा शब्दात 89व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी त्यांचा आनंद व्यक्त केला. अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांची प्रकट मुलाखत पत्रकार संतोष शेणई, प्रसन्न जोशी आणि चक्रधर दळवी यांनी घेतली.
आपला मुद्दा स्पष्ट करताना सबनीस म्हणाले की, साहित्य संमेलनांच्या पार्श्‍वभूमीवर मराठीतील विद्रोही संमेलनाच्या आयोजनामागील निष्ठेलाही मी सलाम करतो, पण त्यांच्या भूमिकेबद्दल मतभेद असू शकतात. अभिजनवादाशी सतत विद्रोही भूमिका पटत नाही. साहित्य संमेलन सुरू करणार्‍या न्यायमूर्ती रानडे यांच्या अभिजनवादी, महात्मा फुले यांच्या बहुजनवादी व शेतकर्‍यांची भूमिका यातला समन्वय मला जास्त संवादी जाणवतो.
आपल्या देशात सहिष्णुता आहे म्हणून नास्तिक असण्याचा विचारही जिवंत ठेवला जातो, असे एका प्रश्‍नाला उत्तर देताना सबनीस म्हणाले की, असहिष्णुता ही पशूतुल्य व कुरुप असते. प्रत्येक समाजात वाईट व चांगल्या प्रवृत्ती असतात. खरा हिंदूधर्म हा मानवतावादी आहे, म्हणूनच बहुजनांवर मोठी जबाबदारी आहे. तसेच आपली राज्यघटनाही तितकीच सक्षम आहे.
पुरस्कार वापसी करणार्‍या लेखकांची चुकले आहे असे वाटत नाही, असे एका प्रश्‍नाला उत्तर देताना सबनीस म्हणाले की, त्यांनी पुरस्कार परत देण्यापूर्वी सरकारचे काय चुकले हे सांगत लोकांचेही प्रबोधन करायला हवे होते. लेखकांमधील पुरोगामी आणि प्रतिगामी यात दोन गटा्रच्या वादात पडण्यापेक्षा लेखकाची लेखणी सत्याशी इमान राखणारी आहे का नाही हे जास्त महत्वाचे. सबनीसांच्या मते सामाजिक समतेची भूमिका मांडणारे शफी बोल्डेकर आदिवासी लेखक भुजंग मेश्राम हे त्यांच्या अंत:करणाचे नायक असून त्यांनी टिळक आणि आगरकरांची तीच भूमिका त्यांच्या साहित्यातून मांडली आहे.
मुस्लिम आणि आदिवासी हुतात्मे हुसेन कुर्बान आणि राघोजी बांगड यांच्या त्यागाचा इतिहास आज मांडला गेला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून सबनीस म्हणाले, महापुरुषांच्या भूमिकेचा विचार केल्यास त्यातील विचारसरणींमध्ये असणारा संघर्ष हा तात्कालिक स्वरुपाचा होता. आज हा संघर्ष महत्वाचा की संवाद हा आपल्या पिढीपुढचा प्रश्‍न आहे. यातून महाराष्ट्राचे नुकसान होता कामा नये.
आपल्या बालपणाबद्दल बोलताना सबनीस म्हणाले की, माझ्या कुटुंबात ब्राह्मणी संस्कार झाले असले तरी वडील जातपात मानत नसल्याने माझ्यावरही ते संस्कार झाले. ज्येष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर, के. रं. शिरवाडकर यांच्या बुद्धीवादावर माझी श्रद्धा असून त्यातून माझे स्वत:चे आकलन कळत न कळत तयार झाले आणि मी समिक्षेच्या वाटेला लागलो. त्यातून डॉ. आंबेडकर, महात्मा फुले यांचा बुद्धीप्रामाण्यवाद नवबुद्धीवाद याकडे बघण्याची दृष्टी मिळत गेली.