आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घुमानवासीयांच्या प्रेमाला, आतिथ्याला तोड नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही नि:शंकपणे घुमानला या, पंजाबी आतिथ्य आणि पाहुणचार काय असतो, याचे दर्शन तुम्हाला घडेल, अशी ग्वाही संमेलनापूर्वीच घुमानवासीयांच्या वतीने सरपंचांनी दिली होती. त्याचा मूर्तिमंत प्रत्यय घुमानमध्ये प्रत्येक पत्रकार आणि प्रतिनिधींनी घेतला आहे. शीख बांधवांच्या सहृदयतेने, पाहुणचाराने सारेच भारावून गेले आहेत.

संमेलनाच्या आधीपासूनच घुमानवासीयांनी पाहुण्यांच्या आगतस्वागताची जोरदार तयारी केली होती. येथील प्रत्येक घरात मराठी प्रतिनिधींची सोय करण्यात आली होती. त्या प्रत्येक घरातली सर्व मंडळी मराठी मंडळींच्या पाहुणचारात मनापासून रंगली होती. सकाळी उठताच चहा, गरम पाणी, भरपेट न्याहारी आणि मग खास पंजाबी आग्रहाने जेवण. यामुळे मराठी मंडळी खुश होती.

प्रत्येकाच्या शेतात पिकणारा रानमेवाही मंडळींसाठी सहज उपलब्ध होता. शेतातल्या उसाचा ताजा रस सार्‍यांना देण्यासाठी सार्‍या कुटुंबीयांची धावपळ सुरू होती. घराच्या अंगणातच उसाचे यंत्र फिरत होते. केवळ घरच्या पाहुण्यांपुरतेच नव्हे, तर पंजाबी मंडळींच्या आतिथ्याचा परीघ सार्‍याच पाहुण्यांसाठी विस्तारलेला होता. वाटेने येणार्‍या-जाणार्‍यांनाही आग्रहाने बोलावून रस, ताक, पकोडे, पराठे खाऊ घालण्यातला उत्साह अवर्णनीय होता.