आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घुमान साहित्य संमेलनात मांडले १५ ठराव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संमेलनाच्या समारोपप्रसंगी साहित्य महामंडळाच्या वतीने मागण्यांचे १५ ठराव मांडले. त्यात ब्रेल लिपीतील साहित्यनिर्मिती वाढवण्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र यंत्रणा उभारावी, किशोरवयीन मुलांसाठी जिल्हावार बालभवनांची उभारणी करावी, ५०० पटसंख्या असणार्‍या प्रत्येक शाळेत स्वतंत्र ग्रंथपाल नेमावा, या मागण्यांचा समावेश आहे. समारोपाप्रसंगी महामंडळाच्या घटकसंस्थांच्या कक्षेतील सर्व ठिकाणांहून ठराव मागवले. त्यांची छाननी करून हे ठराव मांडले जातात. साहित्य संमेलन हे प्रातिनिधिक संमेलन असल्याने या व्यासपीठावरून मांडलेल्या ठरावाला महत्त्व असते. त्यामुळेच ठरावांविषयी उत्सुकताही असते.

यंदा मांडलेल्या ठरावांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन, असंघटित कामगार, वंचितांसाठी आयुष्य वेचणारे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा निषेध करणारा ठराव संमत करण्यात आला. डॉ. दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर निषेधाचा ठराव न मांडल्याने महामंडळ टीकेचे धनी ठरले होते. ती चूक महामंडळाने यंदा सुधारली. मात्र, बेळगाव महाराष्ट्रात यावे, या अर्थाचा कुठलाही ठराव न करून महामंडळाने बेळगावकरांना दुर्लक्षित केले. पंजाब सरकार, मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल, घुमानवासीय यांच्या अभिनंदनाचे ठरावही मांडण्यात आले.

अन्य ठराव असे :
- घुमानला राष्ट्रीय तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा
- मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा
- संमेलनाचे दूरदर्शन व आकाशवाणीवरून थेट प्रसारण करावे
- पंढरपूर येथील संत नामदेवांच्या नियोजित स्मारकासाठी अर्थसाह्य करावे
- बालकुमार संमेलनाला १० लाखांचे साह्य.
- घुमानचे नाव ‘बाबा नामदेवनगरी घुमान’ असे केले जावे
- पंढरपूर ते घुमान ‘नामदेव एक्स्प्रेस’ व्हावी