आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घुमान जागर : साहित्य संमेलनाचे सूप वाजले, राज्यांचा ऋणानुबंध वाढला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो : संमेलनात केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचा सत्कार करण्यात आला.)
संतश्रेष्ठ श्री नामदेवनगरी, घुमान - महाराष्ट्र आणि पंजाबमधील नाते अधिक दृढ करीत घुमान येथील साहित्य संमेलनाचा समारोप झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल जे. जे. सिंग, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक प्रो. रहमान राही, "नया जमाना'चे संपादक जतिंदर पन्नू, संमेलनाध्यक्ष सदानंद मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संकुलात मराठी दुकानांसाठी स्वस्त दरात गाळा ठेवला जाईल, असा नियम महाराष्ट्रात निश्चित करू, असे आश्वासक प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समारोपीय कार्यक्रमात बोलताना केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात गुरू गोविंदसिंह यांच्या नावाने अध्यासन सुरू करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

महाराष्ट्र आणि पंजाबचे नाते साडेसातशे वर्षाचे आहे. साहित्यामुळे एकतेचा पाया मजबूत होतो. संत नामदेवांनी साडेसातशे वर्षापूर्वी घुमान येथे येऊन सामाजिक, साहित्यिक सांस्कृतक एकतेचा पाया घातला. संमेलनाच्या निमित्ताने त्याची उजळणी झाली, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कोणत्याही लिटररी फेस्टिव्हलपेक्षा मराठी साहित्य संमेलन उजवे आहे. मराठी माणसाची साहित्याची भूक मोठी आहे. दीडशे प्रकारची साहित्य संमेलने महाराष्ट्रात होतात. आता फक्त राजकारण्यांचेच संमेलन होण्याचे बाकी आहे. राजकारण्यांचे साहित्य संमेलन होऊ नये आणि साहित्याचेही राजकारण होऊ नये, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मराठीच्या विकासासाठी आधुनिकतेची कास धरली पाहिजे. मराठी ज्ञानभाषा होणे आवश्यक आहे. मराठीत ज्ञान संपादन केल्यावर उपजीविकेचे प्रश्न सुटतात हे लक्षात आल्यावर लोक आपोआप मराठीत शिकायला लागतील, असे फडणवीस म्हणाले. बाजार केंद्रीत व्यवस्थेनेही मराठीसमोर अनेक आव्हाने उभी केली आहे. विजयादशमीला नाट्य वा साहित्य संमेलनाचे अनुदान मागता खात्यात जमा होईल. यापुढे साहित्य संस्थांना मंत्रालयाच्या पायर्‍या चढण्याची गरज राहाणार नाही, असे सांस्कृतिक मंत्री तावडे म्हणाले. भारतीय भाषांचे पहिले संमेलन महाराष्ट्रात घेऊ, असे आग्रही प्रतिपादन तावडे यांनी केले. पुस्तकांचे गाव निर्माण करायचे आहे, असे तावडे यांनी सांगितले.

उन्हाळ्याच्या सुटीत सर्व साहित्यिकांना तेथे बोलावून साहित्य रसिकांशी संवाद साधायचा, अशी कल्पना आहे. किमान पाचशे ते हजार चौरस फूटाचे दुकान स्वस्त दरात स्थानिक स्वराज्य संस्थांनी उपलद्ध करून द्यावे, अशी विनंती तावडे यांनी केली.

दरवर्षी पंजाबात असे संमेलन घ्या
पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांनी दरवर्षी मराठी संमेलन पंजाबात आणि पंजाबी संमेलन महाराष्ट्रात व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. संमेलनामुळे घुमानचे नाव आणि महती पंजाबच्या घराघरात गेले. पंजाबात सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. घुमान ते नांदेड रेल्वे सुरू करावी, अशी मागणी सुखबीरसिंग यांनी केली. यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे इतर वक्त्यांची भाषणे झाली.

राज्यांचा ऋणानुबंध वाढला
केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांनी मराठी रसिकांनी साहित्याची परंपरा टिकवून ठेवल्याचे सांगितले. देशाच्या सुरक्षेत पंजाबची महत्वाची भूमिका असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख प्रभू यांनी केला. दोन राज्यातील ऋणानुबंध पुढे नेण्यासाठी साहित्य संमेलने व्हायला हवीत असे सांगतानाच समाजाला जोडण्याचे काम साहित्य आणि साहित्यिक करतात. त्यासाठी मराठी साहित्यिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रभू यांनी केले.

पुढील स्लाईड्सवर पाहा, घुमान साहित्य संमेलनातील समारोपाचे PHOTOS