आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलन : आगामी काळ प्रतिमा-रूपकांच्या भाषेचा असेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संत नामदेवनगरी, घुमान, पंजाब - येत्या हजारेक वर्षांत भाषेचे "लिखित’ स्वरूप निघून जाईल. आगामी काळ हा प्रतिमा-रूपकांच्या भाषेचा असेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ भाषाभ्यासक डॉ. गणेश देवी यांनी घुमानच्या साहित्य संमेलनातील मुलाखतीदरम्यान केले. नव्या भाषेच्या अभिव्यक्तीसाठी नवी प्रकटीकरणाची साधने निर्माण होतील, असेही डॉ. देवी म्हणाले. डॉ. देवी यांच्याशी संमेलनात प्रकाशक-लेखक अरुण जाखडे आणि सुषमा – यांनी संवाद साधला.

भारत मुळात बहुभाषिक देश असताना इंग्रजी राजवटीत मात्र एकभाषिकतेची (इंग्रजी भाषेची) सक्ती करण्यात आली आणि मुळातली आपली बहुभाषिकतेची सामर्थ्ये कमी होत गेली. एकाहून अधिक भाषा अवगत असल्याने ‘संवादी’पणात जी वाढ होते, त्यापासून पुढील पिढ्या वंचित राहिल्या आणि एकभाषिकतेमुळे एकूणच जगण्याला एकारलेपणा आला, असे निरीक्षण डॉ. देवी यांनी मांडले. बहुभाषिकता किती वेगाने खालावत गेली, याकडे लक्ष वेधत डॉ. देवी म्हणाले, ‘१९५२ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार देशात १६५२ भाषांची नोंद होती. इतक्या भाषा वा बोली बोलणारे लोक होते. ती संख्या पुढच्या वीस वर्षांत अवघी १०८ वर घसरली. धर्मानंद कोसंबी यांच्यासारख्या विद्वान संशोधकाने याविषयी सखोल संशोधन केले आहे. तसेच या भाषिक घसरणीची चिकित्साही केली आहे. आपण पाश्चात्त्य विचारसरणीचा प्रभाव स्वीकारताना आर्थिक घसरणीविषयी बोलतो, अभ्यास करतो पण संवादाचे सर्वांत महत्त्वाचे साधन असणार्‍या भाषिक घसरणीविषयी सारे गप्प बसतात, याची खंतही देवी यांनी मांडली.

या भाषिक घसरणीमुळेच संवादाचे अनेक मार्ग कायमचे बंद झाले. माणूस नावाचा प्राणी आधुनिक काळात जगाच्या ज्ञात इतिहासात सर्वांत हिंसा करणारा ठरला. एकूण सामाजिक ‘हाव’ वाढत चालल्याने हे घडले. ब्रिटिशांनी इथे आल्यावर एका फटक्यात इथल्या विशाल भूभागाची ६० टक्के जमीन ‘फॉरेस्ट एरिया’ म्हणून जाहीर केली आणि तेथील सारे रहिवासी एका क्षणात फक्त ‘वनवासी’ झाले. उर्वरित माणसे ‘पांढरपेशी’ ठरली आणि हे दोन भिन्न गट सामाजिक अंतर राखून आजपर्यंत वावरत आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. हे अंतर कमी करण्याचा प्रयत्न आम्ही ‘आदिवासी अकादमी’च्या माध्यमातून करत आहोत, असे देवी यांनी स्पष्ट केले.

पुढे वाचा, तावडे आणि देसडला यांचे फोटोसेशन...