आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलन : भाषण रेंगाळले, लोक कंटाळले!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संतश्रेष्ठ श्री नामदेवनगरी, घुमान - भारतीय मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्षांचे भाषण अत्यंत महत्त्वाचे असते. यातून मराठी भाषेविषयी,साहित्याविषयी विचार व्यक्त होत असतो. घुमानच्या संमेलनात मात्र मराठी-पंजाबी हे नाते जुळवण्यातच अध्यक्षांनी वेळ घालवला आणि थेट पुस्तकातील पानेच वाचून दाखविल्याने रसिक चांगलेच कंटाळले होते.
घुमान येथे होत असलेल्या 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यंदाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांची भाषणाची वेळ आली आणि आता ते मराठी भाषा, साहित्यासह भाषेला अभिजाततेचा दर्जा, नेमाडेंना जाहीर झालेला ज्ञानपीठ, राज्यातील मराठी भाषा धोरण विषयक काम यावर आता मोरे सकारात्मक वा नकारात्मक बोलतील. पण मोरेंनी आपले भाषणच मुळात पुस्तकातील ओळींनी सुरू केले. हे संमेलन घुमान येथे का घेण्यात आले, त्यामागील कारणं काय, कशासाठी याचीच घुसळण मोरे बराचवेळ करत राहिले.
खरंतर या सगळ्या मुद्यांचे चर्चाचर्वण यापूर्वी अनेकवेळा झालेले आहे. लोकांनाही आता हे जुने झाले आहे. असे असतानाही मोरेंनी तेच ते मुद्दे उगाळले. त्यानंतर मग अगदी संत नामदेवांपासून संत एकनाथ यांचे दाखले त्यांनी दिले. ते उपस्थितांच्या डोक्यावरुन जात नाही तोच मोरे एकदम पानिपतात गेले आणि मराठे -अब्दाली हा संबंध त्यांनी जोडत विचार मांडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. हा विचार पोहोचला नाहीच. आता मोरे नेमाडेंवर बोलू लागले. रसिक खाली टाकलेल्या माना वर करत नाही तोच मोरेंचे भाषण नेमाडेंच्या संमेलन घेण्याच्या वक्तव्यावरुन पुढे सरकले आणि त्यांच्या कादंबरीतील नायकांपर्यंत पोहोचून मूळ साहित्याला बगल देत कधी पुढे गेले रसिकांना कळलंही नाही. हे संगळं होत असताना मांडवातील रसिक मात्र प्रचंड कंटाळला होता.
मांडवातील पंजाबी नागरिकांना ते काय बोलत आहेत हे कळतच नव्हतेच, तर मराठी नागरिकांचे हाल यापेक्षाही कठीण होते. आधीच नाशिक आणि मुंबईहून निघालेल्या रेल्वे उशिराने पोहोचल्या. त्यानंतर त्यातील प्रवासी अमृतसरहून घाईनेच संमेलनस्थळी पोहोचले. प्रवासात न झालेली झोप. त्यानंतर पुन्हा अमृतसरहून घुमानचा प्रवास, ग्रंथदिंडीतील सहभाग यामुळे आधीच सगळे दमले होते त्यामुळे मोरेंचा भाषणावेळी अनेकांनी चक्क झोप काढली, कोणी डुलक्या घेतल्या तर व्यासपीठावर उपस्थित मंत्री एकमेकांबरोबर तेवढ्या वेळात बोलून घेत होते.
एक-दोन जणांनी तर तेवढ्यात फोनवर खेळूनही घेतले. शेवटी उपस्थितांचा संयम सुटला आणि मग मध्येमध्ये टाळ्या सुरू झाल्या, वळवळ सुरू झाली, अनेकांनी तर आपल्या खुर्च्याही सोडल्या. पण मोरेंना वाटत होते की, आपल्या वक्तव्याला दादच मिळते आहे. पण तरीही मोरे थांबेनात मग टाळ्यांचा आवाज वाढू लागला. पण मोरेंनी पुस्तक मात्र पूर्ण वाचून काढले आणि अखेरीस पूर्णविराम दिला. त्यानंतर मात्र माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आले आणि त्यांनी मी आपल्या वर फार अन्याय करणार नाही या वाक्याने सुरुवात करताच रसिकांनी भरभरुन टाळ्यांनी दाद दिली.
वारकरी साहित्य हाच मुख्य प्रवाह
इतिहास लिहित्या-वाचत्यांकडून प्रवाहित होत असतो. त्यात सातत्य आणि सर्वसमावेशकता आवश्यक असते. वारकरी साहित्याचे नेमके हेच वैशिष्ट्य असल्याने वारकरी साहित्य हाच मराठी साहित्याचा मुख्य प्रवाह मानला पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात डॉ. सदानंद मोरे यांनी केले. वारकरी साहित्याने सुमारे पाचशे वर्षे ही साहित्यिक परंपरा अखंडित राखली. समाजाचे आत्मभान जपले.

परकीय आक्रमणांच्या काळात समाज जागृत ठेवला. मात्र वारकरी साहित्याला मराठी साहित्यात महत्त्वाचे स्थान न देणे, ही आपली वाङ्मयीन चूक ठरली, असे मतही मोरे यांनी मांडले. सामाजिक जाणिवा आणि वैश्विकतेचे भान वारकरी साहित्याने जागवले. ज्ञानदेवांचे पसायदान हा त्याचा सर्वश्रेष्ठ आविष्कार आहे. भाषेचा जणु जाहीरनामाच पसायदानातून ज्ञानदेवांनी सांगितला आहे. कर्मकांड, अंधश्रद्धा, अवडंबर यांचा निषेध करून साऱ्या भेदांपलीकडे नेणारी सर्वसमावेशक परंपरा वारकरी साहित्याने निर्माण केली, असे मोरे म्हणाले.