आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घुमान संमेलन : ‘मराठी’च्या स्वागताची पंजाबींमध्ये लगबग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संत नामदेवनगरी, घुमान - सकाळी दहाची वेळ.. हवा प्रसन्न पण जराशी ढगाळ.. सकाळी सकाळी पावसाचा शिडकावा झालेला, घुमानच्या दिशेने धावणारी गाडी गावात शिरते त्या क्षणापासून घुमानवासीयांची लगबग नजरेत भरते. गावात जाणाऱ्या रस्त्याची डागडुजी आणि डांबरीकरण वेगाने सुरू असते. हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी सगळ्यांची घाई सहज कळते. ठिकठिकाणी दिशादर्शक फलक स्वागत करतात. रस्त्याकाठच्या झाडांवर, विजेच्या खांबांवरसुद्धा हे फलक टांगलेले दिसतात.
गाडी घुमानमधल्या संत नामदेवबाबा यांच्या मंदिराजवळ थांबते. हे समाधीस्थळ तब्बल ६५० वर्षांपूर्वीचे, पण घुमानवासीय आणि अर्थातच पंजाब सरकार यांनी हे समाधीस्थळ अशा पद्धतीने जतन केले आणि सजवले आहे, की त्यांच्या कल्पकतेला आणि नामदेवांविषयीच्या भक्तिभावनेला दाद द्यावीच लागते. श्री नामदेव दरबार कमिटीचे पदाधिकारी साहित्यप्रेमींचे अगत्याने स्वागत करतात. तरसेनसिंगजी आणि गुरूचरणसिंगजी कमिटीच्या कार्यालयात बोलावून माहिती देतात.

पंजाबी-मराठीचा संगम : ‘आमच्या दृष्टीने संत नामदेवजी यांच्या मूळ स्थानाकडून आलेले तुम्ही सारेच वंदनीय आहात. या संमेलनाच्या निमित्ताने पंजाबी आणि मराठीचा भक्तीसंयोगच घडतो आहे,’ अशा शब्दांत स्थानिक पदाधिकाऱ्यांरी भावना व्यक्त केल्या.

चहा- बिस्किटांनी स्वागत होते. या समाधीस्थळानजिक आणि आवारातही भक्तनिवास बांधले असून, अनेक मराठी मंडळींची सोय येथे केली आहे. आवारातच बाबा नामदेव कॉन्हेंट स्कूल आहे. बाबा गुरूदास भवन आहे आणि नामदेवांच्या मातोश्री गोणाबाई यांच्याही नावाने संकुल दिसते. सगळीकडे कमालीची स्वच्छता, प्रसन्न चेहऱ्याने वावरणारे रहिवासी, हसतमुख सेवेकरी असे चित्र घुमानमध्ये दिसते.
स्थानिकांचा सहभाग

पंजाबी प्रांतात वंदनीय असलेल्या संत नामदेवांच्या नगरीत वास्तव्य करणारे घुमानवासीय मराठी भाषेच्या उत्सवासाठी उत्सुक दिसले. स्त्रिया फारशा दिसल्या नाहीत, पण पुरुषमंडळी मात्र अगत्यपूर्वक येणाऱ्यांच्या स्वागतात रमली होती. ज्येष्ठांपासून ते शाळकरी मुलांपर्यंत सर्व घुमानवासीय या संमेलनाविषयी कुतूहलपूर्वक प्रयत्न करताना दिसत आहेत.
विशेष रेल्वेत भेदाभेद अमंगळ !
प्रचंड भरलेल्या बॅगा, ढोल, मृदंग, पांघरुणाच्या वळकट्या, पिशव्या, पाण्याच्या बाटल्यांचे खोके आणि असंख्य माणसे या सगळ्यांचं पुरण भरलेली एक करंजी, अशी कल्पना पुलंनी त्यांच्या ‘म्हैस’ या कथेत बससाठी केली आहे. अगदी हेच वर्णन घुमानकडे निघालेल्या रेल्वेसाठी लागू पडते. फक्त या रेल्वेपुढे ‘म्हैस’ येत नाही, तर रेल्वेत माशी शिंकते आणि मग चर्चात्मक संघर्ष सुरू होतो तो एसी डबा विरुद्ध इतर सर्व डबे.

नाशिकहून संमेलनासाठी निघालेल्या विशेष रेल्वेतील हे चित्र. इंजिनाला लागून असलेला एसी डबा, त्याला लागून म्हणे व्हीआयपींसाठी, मग इतरांसाठी डबे असे अठरा एक डबे या गाडीला. शेवट भटारखाना. पण, या इंजिनाला लागून असलेल्या डब्यात काहीतरी वेगळं घडतंय याची चर्चा गाडीभर. मग रसिकांपैकी काही कुतूहल असलेल्यांनी थेट डोकावून पाहण्याचाच प्रयत्न केला अन् सगळ्यांच्याच शंका खऱ्या ठरल्या. चहा आधी एसी डब्यात, पाणी एसीत, जेवण ते तर आधी एसीतच द्यायला हवे. ते कोण आहेत तर सो कॉल्ड निमंत्रित. यांना निमंत्रित म्हणतात, हे रेल्वेतील अनेकांना माहीतही नव्हते.

हे कोण.. हे कोण.. हा गवगवा होत शेवटपर्यंत होताच. यांची एवढी बडदास्त कशासाठी याचा शोध नव्हे तर ही बडदास्त कशी, हाच विषय सुरू झाला नव्हे तर दिसलाही. टळटळीत ऊन, खायला वेळेवर नाही, नाश्त्याच्या वेळी चहा, जेवणाच्या वेळी नाश्ता अशी परिस्थिती असताना डब्यातील प्रवाशांमध्ये असंतोष झाला नाही तर नवलच. पण, या एसी डब्यात मात्र सारं काही अालबेल सुरू होतं. कारण तेथे होते स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी त्यांची ठेवलेली खास माणसं, त्यांचे नातेवाईक, आपले काही साहित्यिकही.

या मंडळींमध्ये नाशिकहून नियोजन केलेले येथे मात्र कोणीच दिसले नाही. ना उत्साहाने काम करणारे अरुण नेवासकर, ना त्यांचा एकही कार्यकर्ता. यामुळे तर या असंतोषात भरच पडत होती. कारण लोकांच्या डोळ्यादेखत त्या एसीत आईस्क्रीम जात होते, लस्सी जात होती. काही लोकांनी तर येथे नॉनव्हेज पोहोचल्याचीही वार्ता मिळवली होती. ही जागा आणि बडदास्त साहित्यिकांसाठी, प्रवाशांसाठी की, आयोजकांच्या जवळच्या लोकांसाठी वा त्यांच्या नातेवाईकांसाठी. बरं इथं साहित्यिक बसले होते.
साहित्यिकांना संवेदशनशील म्हटले जाते. त्यांच्याही संवेदना बोथट झाल्या होत्या की काय? विठ्ठल आणि शंकर जसे सामान्यांचे दैवत तसे याच नावाचे दोन साहित्यिक लोकांमध्ये अधूनमधून मिसळले. बाकी आम्ही गोरेगोमटे सारस्वत..

‘शी तिकडे कशाला जावे’ अशा तुच्छतेने या इतर डब्यांकडे संवेदना हरवत बघत होते. बरं यात भेदाभेदमध्ये देसडला यांनी पुण्याहून पाठविलेल्या खास काही लोकांचाही समावेश होता. ते सगळ्यांसाठी होतं की, या एसी डब्यातील माणसांसाठी हाच प्रश्न पडावा. त्यामुळेच डब्यात कोणी चहावरून भांडत होते, तर कोणी नाश्त्यावरून. कारण भेदाभेद असतोच अमंगळ. संताच्या स्मृतिस्थळी आपण जात आहोत.

गाडीत एकीकडे काव्यसंमेलन रंगत होते, तर दुसरीकडे भजनेही होत होती, तीच जरा अधिक होती. तरी संतांनी त्यांच्या जीवनात अनुभवला तो भेदाभेद इथे त्यांच्या भक्तांनाही मिळाला. म्हणूनच भजनी मंडळांनी मग संत तुकारामांचा ‘विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ, आयका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा’, हा अभंग गाऊन निषेधच व्यक्त केला.
भुकेल्या साहित्यप्रेमींची केटरर्ससोबत बाचाबाची
नाश्त्याच्या वेळी चहा, जेवणाच्या वेळी नाश्ता काहींना मिळतोय, तर काहींना नाही. साधी पाण्याची बाटलीही दहा वेळा मागावी लागते. यामुळे अखेरीस संयम सुटलेल्या एका डब्यातील प्रवाशांची केटरर्सच्या पोरांबरोबर गुरुवारी चांगलीच बाचाबाची झाली.

नाशिकहून विशेष रेल्वेने घुमानकडे निघालेल्या रेल्वेचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी आयोजकांनी तयारी केली. पण, ती अपुरीच पडली. रेल्वेत तब्बल १२०० लोक. त्यांच्यासाठी एकच पॅँट्रीकार. या भटारखान्यात सकाळचा नाश्ता, चहा, जेवण असं सगळंच तयार होत होतं. बरं भटारखाना हा रेल्वेला जवळपास शेवटी जोडलेला होता. त्यामुळे जे पदार्थ तयार झाले ते भटारखान्यातून निघत आधी थेट एसी डब्यात जातात. हा एसी डबा म्हणजे इंजिनाला लागून, म्हणजे हे पदार्थ घेऊन हे वेटर पूर्ण रेल्वे क्रॉस करून येतो, त्यामुळे लोकांना आता आपल्यालाही मिळेल अशी अपेक्षा असे.
दुसरे म्हणजे इतर प्रवाशांना हे पदार्थ देण्याची सुरुवात ही भटारखान्याला लागून असलेल्या डब्यांपासून होत असे. मधले आणि इंजिनाकडील डब्यांमध्ये हे पदार्थ पोहोचायला बराच उशीर होत असे.

आता ही गाडी विशेष. ही फारशी मोठ्या स्टेशनमध्ये थांबलीच नाही. आऊटींगला बरीच थांबते त्यामुळे लोकांना स्टेशनवरून खाण्यासाठी घ्यायचीही सोय नव्हती. शेवटी भुकेने व्याकूळ लोकांनी आपला रोष व्यक्त केला, अन् लोक थेट भटारखान्यात वाद घालू लागले. तसेच काही डब्यांमध्येही वेटर्सबरोबर चांगलीच बाचाबाची झाली. अखेरीस काही ज्येष्ठांनी मध्यस्थी करत हा वाद सोडवला आणि सगळ्यांना जेवण मिळवून दिले.