आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ghuman Special Train Traval Experance Is Very Bad

घुमानहून निघालेल्या साहित्य प्रेमींच्या भोजनाची अबाळ, रेल्वेत 14 तासांपासून ठणठणाट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घुमान विशेष रेल्वेतून : 88 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी गेलेल्या साहित्यप्रेमींची परतीच्या प्रवासात भोजनाची अबाळ होत आहे. रविवारी रात्री 12 वाजता सुरु झालेल्या प्रवासाच्या 12-14 तासानंतरही अनेक प्रवाशांना नाश्ता मिळालेला नाही. तर दुपारी दोन वाजता पर्यंत दुपारचे जेवणही आलेले नाही. परतीच्या प्रवासात गाडी बदलल्यामुळे असे झाल्याचे आयोजक आणि रेल्वे केटरींग सर्व्हिसकडून सांगण्यात आले आहे.
घुमानला जाताना रेल्वेला झालेल्या प्रचंड उशीरामुळे साहित्य यात्रींचे हाल झाले. त्यात आता परतीच्या प्रवासात नाश्ता आणि भोजनास होत असलेल्या उशिरामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. रविवारी रात्री बारा वाजता सुरू झालेल्या प्रवासानंतर सोमवारी दुपारी एक पर्यंतही जेवण देण्यात आले नाही.
पुणे ते घुमान प्रवासादरम्यान साहित्य यात्रींना अनेक तास तिष्ठत राहावे लागल्याची दखल रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतली होती, त्यामुळे परतीच्या प्रवासात रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही दिरंगाई होणार नाही, अशी आशा होती, मात्र 12 तासांच्या प्रवासातच ती फोल ठरली आहे.
रविवारी रात्री समारोपाचा सोहळा आठ वाजता संपला. त्यानंतर घाई-घाईत सर्वांनी मिळेल ते खाऊन घुमानहून बियासकडे प्रस्थान केले. बियासहून रात्री बाराच्या सुमारास रेल्वे सुटली. सोमवारची सकाळ या रेल्वेतील सर्व साहित्य प्रेमींसाठी संकटांची मालिकाच घेऊन आली.
चहा, नाशत्यासाठी आरडाओरड
सकाळी उठल्यानंतर अनेक बोगींमध्ये चहा आला नाही. काही बोगींमध्ये अर्ध्या प्रवाशांना चहा मिळाला, उरलेले सर्व दुपारी बारापर्यंत चहाची वाट पाहत राहिले. नाश्त्याची सोय देखील यापेक्षा वेगळी नव्हती. अनेक जणांनी दुपारी एकच्या सुमारास दिल्लीच्या नजीक असलेल्या ज्या - ज्या स्टेशनवर रेल्वे थांबत होती त्याठिकाणी उतरून पोटपुजा केली.

जेवणाला उशीर होईल, परिस्थिती समजून घ्या आणि सहकार्य करा
दुपारी दोन वाजेपर्यंत बोगींमध्ये जेवणाची व्यवस्था झालेली नव्हती. रेल्वेतील नियोजन पाहणार्‍या टीममधील एका सदस्याने दुपारी एकच्या सुमारास प्रत्येक बोगीत येऊन जेवणाला उशीर होणार असल्याचे सांगितले. आमच्याकडे साहित्याची कमतरता आहे, परिस्थिती समजून घ्या आणि सहकार्य करा, असा विनंतीवजा आदेश त्यांनी रेल्वेतील साहित्यप्रेमींना दिला.
रेल्वे बदलल्याचे कारण
घुमानला एक नाशिकहून आणि एक मुंबई-पुणे मार्गे अशा दोन रेल्वे आल्या होत्या. या दोन रेल्वे गाड्यांची अदलाबदल परतीच्या प्रवासावेळी झाली. नाशिकहून आलेली गाडी पुणे-मुंबईसाठी सोडण्यात आली तर, पुणे-मुंबईची गाडी नाशिकसाठी सोडण्यात आली. यामुळे स्वयंपाकाचे साहित्य दुसर्‍या रेल्वेत राहिल्याचे केटरींग आणि इव्हेंट मॅनेजमेंटचे लोक सगळ्यांच्या गळी उतरवत होते.
फोटो - पुणे-घुमान विशेष रेल्वेतील संग्रहित छायाचित्र.