आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घुमान : परतीच्या प्रवासातही प्रचंड हाल; रेल्वेत सोयी कमी, त्रासच जास्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संत तुकाराम महाराज संमेलन विशेष रेल्वेतून - पंजाबमधील घुमान येथे झालेल्या साहित्य संमेलनाहून साहित्यिक आणि प्रवासी उत्साहाने नाशिक आणि पुणे, मुंबईकडे रवाना होत असताना दोन्ही रेल्वेत प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. त्यामुळे अनेक डब्यांतील प्रवाशांचा रेल्वेतील संयोजकांशी वाद झाला.

मराठी साहित्य संमेलनचे तीन दिवस रसिकांनी चांगले पंजाबी आदरातिथ्य अनुभवले. पण संमेलन संपून काही तास उलटत नाहीत तोच त्यांना पुन्हा संयोजकांच्या ‘गरज सरो वैद्य मरो’ प्रवृत्तीचा अनुभव आला. रविवारी रात्री उशिरा पंजाबातील टांडा उमरड येथून नाशिककडे तर बियासहून पुण्याच्या दिशेने रेल्वे निघाल्या. नाशिकडील रेल्वेत नाशिक, अकोला, जळगाव, धुळे, औरंगाबाद, उस्मानाबादचे प्रवासी होते.

टांडा उमरड म्हणा की बियास म्हणा हे दोन्ही रेल्वेस्टेशन्स अगदीच लहान. त्या ठिकाणी खाण्यासाठी काहीच नव्हते. शेवटी टांडा उमरडवर पंजाबी बांधवांनी चहा-बिस्किटांचा लंगर लावल्याने भुकेल्या प्रवाशांना जरा आधार मिळाला. अशी-तशी गाडी सुरू झाली. सकाळ होताच पुन्हा आरडाओरडा. चहाच मिळाला नाही. आता येईल, मग येईल या आशेवर प्रवासी दुपारपर्यंत बसलेलेच होते. मग काही डब्यांत चहा मिळाला तर काहींना मिळाला नाही. तोपर्यंत नाष्ट्याची वेळ झाली. पुन्हा तेच. एका डब्यात तर वेटर्स आणि प्रवाशांमध्ये हाणामारी झाली.

दुसरीकडे मात्र एसी डब्यात संयोजक, काही स्वयंघोषित साहित्यिकांची सरबराई सुरू हाेती. एक-दोन साहित्यिकांनी तर इतर प्रवाशांशी आणि पत्रकारांशी वाद घातला. या वादाचे कारण म्हणजे जेवणाचे काँट्रॅक्ट दिलेल्यांकडून झालेली अर्वाच्य भाषा. अखेर नाष्टा आला. तोही एक त्रिकोणी आकाराचे सॅँडविच अन् सोनपापडीचे दोन तुकडे. एव्हाना सर्वच प्रवासी भुकेले होते. जेवण तरी वेळेवर येईल या विचाराने त्यांनी तो नाष्टा केला. पण जेवण वितरणास जवळपास दोन वाजेनंतर सुरुवात झाली. हे जेवण एसी डब्यात वेळेत पोहोचले. पण दोन नंबरच्या डब्यात ते ३.४५ वाजता आले. काही ठिकाणी यामुळेही बाचाबाची झाली. मग कंटाळलेल्या प्रवाशांनी दोन-दोन प्लेट्स घेतल्या. यामुळे काही जेवण पुरलेच नाही.

पुण्याच्या गाडीतही तीच परिस्थिती
पुण्याकडेगेलेल्या गाडीतही प्रवाशांचे हेच हाल झाले. त्या गाडीत जेवण मिळाल्याची तक्रार करणार्‍या ज्येष्ठ नागरिकांबरोबर संयोजन समितीचे सदस्य गिरीश जैन यांची अक्षरश: हमरीतुमरी झाल्याची माहिती आहे.

सोशल मीडियावर ‘शेम शेम...’
दोन्हीरेल्वेत प्रवाशांचे हाल होत असल्याच्या पोस्ट व्हॉट्स अॅप फेसबुकवर होत्या. यावर राज्यभरात निषेधाचा सूर होता. कोणी ‘शेम शेम, निषेध-निषेध, संयोजकांना सुनावून या... देसडलांना कळवा....’ अशा प्रतिक्रिया दिल्या.

म्हणे, गाडी बदलल्याने गैरसोय
याबाबत पुण्याच्या सुनील शिंदे यांना विचारले असता, त्यांनी सरळ रेल्वेकडे बोट दाखवले. ते म्हणाले, चुकून पुण्याची गाडी नाशिककडे तर नाशिकची गाडी पुण्याकडे गेल्याने भटारखान्यात खूप गैरसोयी झाल्या. त्यांच्यासमोर बसलेले एक साहित्यिक मध्येच बोलू लागले. त्यांनी पत्रकारांनाही उद्धट भाषेत बोलण्यास सुरुवात केली. यामुळे वाद अधिकच वाढू लागला.

पैसे देऊनही खायला मिळेना
संमेलनासाठीही विशेष गाडी असल्याने ही नेहमीच्या ट्रॅकवर थांबत नव्हती. त्यामुळे ती एखाद्या स्टेशनवर थांबली तरी प्रवाशांना पैसे मोजून बाहेरून काही घेता येत नव्हते. शिवाय गाडीतही पदार्थ विक्रेते येतच नव्हते. बरोबर घेतलेले तहानलाडू-भूकलाडू जातानाच संपलेले होते. यामुळे प्रवाशांचा संताप नव्हे तर भूक बोलू लागली होती. पण याचे रेल्वेचे संयोजक सुनील शिंदे यांना काहीही सोयरसुतक नव्हते. पण पहिल्या दिवशीच्या या अनुभवाने दुसर्‍या दिवसाची धास्ती प्रवाशांमध्ये होतीच.