आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलन : कविसंमेलनात रंगली ‘विठ्ठल गवळण’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घुमान - बिशुद्ध भक्तिभाव मांडणाऱ्या आर्त ‘धाव्या’पासून सामाजिक, राजकीय, शेतकरी आत्महत्या, नातेसंबंध, प्रेम, स्त्रीवाद... अशा भावभावनांचे प्रकटीकरण करणाऱ्या कवितांची मैफल संमेलनातल्या निमंत्रितांच्या कविसंमेलनात रंगली, मात्र नंदन रहाणे यांच्या ‘विठ्ठलाच्या गवळणी’ने रसिकांची दाद मिळवली.

केशर कुंकुम गुलाल घेऊन, विठ्ठल काळा लिंपावा
कस्तुरी चंदन सुगंध त्याच्या, अंगोपांगी शिंपावा
तरीही त्याचा अबीर आणिक, तुळसीगंध लपेचना
बाई, मजला छळतो विठ्ठल,हृदयी शिरला, निघेचना..

नंदन रहाणे यांच्या या विठ्ठल गवळणीने कविसंमेलनात एक वेगळाच रंग भरला. त्यापूर्वी नागपूरचे कवी तुषार जोशी यांच्या ‘फेअर अँड लव्हली’ कवितेलाही दाद मिळाली. कवयित्री दाक्षायणी पंडित यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या ज्वलंत विषयावरील कविता सादर करून वास्तवतेची दाहकता दर्शवली. प्रसन्न शेंबीकर यांनी ‘देऊळ’ कवितेतून एक वेगळे वास्तव समोर ठेवले. वैभव जोशी यांनी ‘राष्ट्रगीत’ या कवितेतून समाजाची, कुटुंबाची बदलती मानसिकता अधोरेखित केली. संदीप खरे यांनी ‘दु:ख येतेच’ ही कविता खास शैलीत सादर करून टाळ्या घेतल्या. दु:खाला नकार न देता, त्याचे स्वागत करून त्याला भेटावे, असे सांगत दु:ख ही भावना त्यांनी एखाद्या ‘व्यक्तिरेखे’सारखी कवितेत संवादी केली होती.

पावसात भिजलीस की तू खूप सुंदर दिसतेस
असे म्हटले, तेव्हा भर पाण्यात पेटलीस,
तुला अपमान वाटला तो स्त्रीपणाचा, अशा शब्दांत रामदास फुटाणे यांनी कवीसंमेलनाचा समारोप करताना, आकर्षित करणारा पश्चिमवारा असला तरी
पूर्वेकडची झुळूकसुद्धा अजून सूर्याचीच किरणे आणते
मला मुक्ती नको, तुझं बंधन हवंय, असेही सांगितले.
ग्रंथप्रदर्शनात तुरळक गर्दी, फक्त २५ ते ३० स्टॉल्स
घुमानच्या संमेलनावर प्रकाशक परिषदेने एकमुखाने बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्यावर, त्याचे पडसाद घुमानच्या ग्रंथप्रदर्शनात स्पष्ट उमटलेले दिसत आहेत. ‘संत ज्ञानेश्वर महाराज ग्रंथप्रदर्शना’त जेमतेम २५ ते ३० स्टॉल्स आहेत. त्यातील बहुतांश स्टॉल्स धार्मिक पुस्तकांची विक्री करणारे आहेत. मोजक्या ठिकाणी ग्रंथाली, शब्द पब्लिकेशन यांची नावे दिसत आहेत. या एकाच ठिकाणी मौज प्रकाशनाची काही पुस्तके पाहावयास मिळाली. राज्य मराठी विकास संस्था, मराठी विश्वकोश मंडळ वाई यांचे मिळून ६ स्टॉल्स आहेत. शब्द प्रकाशन, ग्रंथाली, शतायुषी, चपराक, अक्षरमानव, महाराष्ट्र साहित्य परिषद आंध्र प्रदेश, महाराष्ट्र पर्यटन महामंडळ, राज्य माहिती व जनसंपर्क महासंचालनालय हे स्टॉल्स वगळता उर्वरित सर्व स्टॉल्स धार्मिक पुस्तकांची विक्री करणारे आहेत. त्यामध्ये लिमये विश्वप्रकाश, ज्ञानप्रबोधिनी, विद्याधर ठाणेकर प्रकाशन, महानुभाव प्रकाशन, वर्धा सेवाग्राम आश्रम भांडार साहित्य, सत्संग प्रकाशन, मोक्षधाम प्रकाशन, स्वामी विद्यानंद सेवा मंडळ आदींचे स्टॉल्स आहेत.