आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलन : महाराष्ट्रात एकच प्रमाणभाषा नसल्याचा सूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संतश्रेष्ठ श्री नामदेवनगरी, घुमान - पुणेरी लोकांना जे येते वा पुणेरी मराठी म्हणजेच प्रमाणभाषा आहे, हा गैरसमज दूर केला पाहिजे. महाराष्ट्राची कोणतीही एक प्रमाणभाषा नाही. प्रमाणभाषेला प्रमाण मानून तयार केलेली पाठ्यपुस्तके भंपक आहेत इथपासून त्या त्या प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषा याच तेथील प्रमाणभाषा असतात अशी अनेक वक्तव्ये मराठीवरील अभिरूप न्यायालयात झडली.
भाषिक उदासीनतेमुळेच मराठीचा दबदबा कमी होत आहे. गरज निर्माण होईल अशी स्थिती आणली पाहिजे. त्यासाठी घरात तरी कटाक्षाने मातृभाषेत बोलावे, असा वक्त्यांचा सूर होता. ‘दृकश्राव्य माध्यमांतील संहितालेखन’ हा विषय होता. रामदास फुटाणे न्यायाधीश होते, तर वकिलाची भूमिका सुधीर गाडगीळ यांनी निभावली. अभिनेते संजय मोने, मोहन जोशी, पत्रकार राजीव खांडेकर, रसिका देशमुख, राजन खान सहभागी होते. बोलीभाषा आणि तिचे सौंदर्य टिकवले पाहिजे.
भाषिक न्यूनगंड न बाळगता आपल्या बोलीत बोलले पाहिजे. बोली भाषेचे प्रवाह टिकले तरच मराठी समृद्ध होईल, असे खांडेकर म्हणाले.
मालिकांच्या संहिता लेखनात तडजोडी कराव्या लागतात. अनेकदा पर्यायी शब्द द्यावा लागतो. मराठीचा आग्रह हवा; पण दुराग्रह नको, असे मोने म्हणाले. मराठीत प्रत्येक शब्दाला किमान तीन-चार तरी पर्यायी शब्द आहेत. त्याचा वापर सहज करता येईल. तेवढीही तसदी कोणी घेत नाही, अशी खंत व्यक्त करून वाहिन्यांनी मुद्रितशोधक ठेवावेत, असे खान म्हणाले.