आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलन : घुमानमध्ये घुमला नाशिकचा ढोल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घूमान - ततडम ढुम्म ढुम्म... ततडम ततडम ढुम्म ढुम्म ढुम्म... असा नाशिकच्या गल्लोगल्ली घुमणारा गुलालवाडीचा ढोल आज पंजाबच्या घुमानमध्ये घुमला आणि यावर मराठीमनच नव्हे तर सारस्वत अन् पंजाबी तरुणांनीही ताल धरत हा सूर मराठी नाही तर मराठी पंजाबी असल्याचे अधोरेखित केले.
नाशिकमध्येच नव्हे तर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेला नाशिकढोल आणि त्यातही गुलालावाडीच्या पथकाने दाखविलेले प्रात्याक्षिक म्हणजे पंजाबातील घुमान येथे सुरू असलेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी आलेल्या साहित्य रसिकांसाठी, नामदेव भक्तासांसाठी आणि खास म्हणजे पंजाबातील नागरिकांसाठी एक पर्वणीच ठरली. तरुणींची मराठमोळी वेशभूषा, सर्वत्र फडकणारे भगवे ध्वज, टाळ-मृदुंगाचा गजर, कुठे भेटे विठू तर कुठे तुका नामा.... ज्ञानोबा माऊली तुकारामाचा जयघोष... अशा उत्साहात घुमान नगरीच्या गल्लोगल्लीतून मराठी ढोलनाद सुरू होताच. त्यात पंजाबच्या कान्याकोपऱ्यातून आलेले रसिकही सामील होत होते.
ढोलवर ढोल आणि त्यावर एखादी मराठमोळी तरुणी चढते आणि जल्लोषात ढोल वाजवत अभिवादन करते, हे अभिवादन ग्रंथदिंडीतील नागरिकही नृत्याचा ताल धरत स्विकारतात. तर दुसरीकडे विठोबाचा वेष करून आलेला तरुण सगळ्यांचेच लक्ष वेधतो. काही वृद्धा तर थेट त्याच्या पायावर डोकंच ठेवतात. एखादा कीर्तनकार विणेवर ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणतो. त्याच्यापुढे एखादी जनाबाई तुळशी घेऊन पुढे विठूरायाच्या भेटीची आस घेत पुढे चालते... ही सगळी मराठी संस्कृती, परंपरा आपली नाही, तरीही तिला आपलीशी करत पंजाबी बांधव-भगिनी या दिंडीत सहभागी होत बाबा नामदेवांचा गजर करत.