आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Panjab Kesari Editor Interview In Sahitya Samelan Ghuman

साहित्य संमेलन : पावित्र्य जपायचे तर संपादकांनी राजकारणात जाऊ नये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संत नामदेवनगरी, घुमान, पंजाब - सध्या वर्तमानपत्रांचे संपादक राजकारण करतात. राजकारणात सक्रिय सहभाग घेतात. अनेक संपादक राज्यसभेत जातात; पण पत्रकारितेचे पावित्र्य राखायचे असेल तर संपादकांनी राजकारणात जाऊ नये, असा मौलिक सल्ला पंजाब केसरीचे ज्येष्ठ संपादक विजय चोप्रा यांनी येथे दिला. शनिवार, ता. ४ रोजी सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी विजय चोप्रा यांची प्रकट मुलाखत घेतली. त्या वेळी चोप्रा यांनी रोखठोक मते व्यक्त केली.

हल्ली संपादक राजकारणात सहभागी होत आहेत. त्याचा परिणाम वर्तमानपत्रावर होतो. संपादक ज्या पक्षाचा उमेदवार असतो, त्या पक्षाचा प्रचार त्याला करावा लागतो. वर्तमानपत्राच्या ध्येयधोरणांवर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो, हे लक्षात घेता संपादकांनी राजकारण टाळावे, याचा पुनरुच्चार चोप्रा यांनी केला.
आपल्या भूमिकेवर ठाम राहणारे संपादक मला आवडतात, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. नरेंद्र मोदींचा विजय वैयक्तिक नाही. आता तर उशिराने का होईना सरसंघचालक मोहन भागवत यांनीही ही बाब स्पष्ट केली. देशात दहा वर्षांहून अधिक काळ राहिलेल्या संपुआ सरकारमुळे मोदी विजयी झाले. इंग्रजी प्रभावामुळे मात्र प्रादेशिक भाषा संकटात येत आहेत. एकदा विदेशात गेलेला मुलगा स्वत: तर परत येत नाहीच, शिवाय आपले आईवडील व मित्रांनाही तिथे बोलावून घेतो. कमीत कमी आपल्या घरात तरी आपली भाषा बोलली पाहिजे, असे चोप्रा म्हणाले. पंडित नेहरूंपासून डॉ. मनमोहनसिंग यांच्यापर्यंत सर्वच पंतप्रधानांनी चांगले काम केले.
मोदीही करतील; पण अजून महागाई कमी झालेली नाही आणि काळे धन परत आलेले नाही. त्यांचा उद्देश तर चांगला आहे. मात्र, निकाल अजून मिळायचा आहे. संमेलनाची आयोजक संस्था असलेल्या सरहदचे संजय नहार यांचे चोप्रा यांनी तोंडभरून कौतुक केले. पंजाब आणि महाराष्ट्रात सुसंवाद निर्माण करणाऱ्या संजय नहार यांच्यात मी शिवाजी महाराजांचे लघुरूप पाहतो, असे चोप्रा म्हणाले.

प्रादेशिक दैनिकांची संख्या वाढली

इलेक्ट्रॉनिक चॅनेल्सच्या वावटळीत प्रादेशिक दैनिके उडून जातील, असे म्हटले जात होते. मात्र, प्रत्यक्षात प्रादेशिक दैनिकांची संख्या वाढली असून त्यात रोज नवनवीन दैनिकांची भर पडत आहे. याला कारण आपल्याकडे दोन-तीन रुपयांत वर्तमानपत्र मिळते. शिवाय त्याचा पॅकिंग व रद्दीसाठीही उपयोग होतो. आपल्याकडे रद्दी विकून पैसे येतात. त्यामुळे भारतात वर्तमानपत्रांना अच्छे दिन आहेत, असे ते म्हणाले.
पेड न्यूजची चर्चा, निवडणूक खर्चाचे काय?
निवडणुकीच्या काळात पेड न्यूजची खूप चर्चा होते. पण असे काही होत असेल, असे मला वाटत नाही. निवडणुकीत होणाऱ्या भरमसाट खर्चाविषयी कोणीच काही बोलत नाही. लोकसभा वा विधानसभा निवडणुकीत उमेदवार कोट्यवधींचा खर्च करतो आणि आयोगाने ठरवून दिलेल्या खर्च मर्यादेत हा खर्च बसवतो. नरेंद्र मोदींनीही निवडणुकीत कोट्यवधींचा खर्च केला. आणि अशाच प्रकारे कमी दाखवला. त्यापेक्षा प्रत्यक्षात जेवढा खर्च होतो तेवढी मर्यादा वाढवायला हवी, असे चोप्रा यांनी स्पष्ट केले.
चार वर्षांचे सरकार हवे
पाच वर्षे हा कालावधी खूप होतो. त्यापेक्षा चार वर्षांचेच सरकार हवे. आघाडीचे सरकार दोन-तीनदा निवडून आले. तिथे गडबड घोटाळा झालाच म्हणून समजा. त्यामुळे सरकार वारंवार बदलून आले पाहिजे, ते सुदृढ लोकशाहीसाठी आवश्यक आहे, असे चोप्रा म्हणाले.