आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कविसंमेलनातून साजरा झाला भावभावनांचा शब्दोत्सव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘विसरता येत नाही, असे नसतेच काही मनाला सांगणारे, नवे मिळतेच काही, असा आशावाद मांडत कवी अरुण म्हात्रे यांनी निमंत्रितांच्या कविसंमेलनाचा आशादायी शेवट केला. मात्र, विविध ठिकाणांहून आलेल्या कवींनी आपल्या उत्तमोत्तम कवितांनी संमेलनाच्या मंडपात दुपारी अक्षरश: भावनांचा शब्दोत्सवच साजरा झाला. प्रेम, दु:ख, विरह, आनंद, करुणा, वेदना अशा मानवी भावनांची पालखीच जणू कवींनी खांद्यावर वाहिली आणि त्या यात्रेत रसिकांनाही सहभागी करून घेतले. या कविता रसिकांनाही भावल्या. भावनांचे कल्लोळ मांडणार्‍या कवितांप्रमाणेच जागतिकीकरणामुळे आलेल्या कसुरीपणावर, एकटेपणावर भाष्य करणार्‍या कवितांनीही दाद मिळवली. फडकणार्‍या झेंड्याविषयी सारे बोलतात, पण झेंडा तोलून धरणार्‍या खांबाविषयी मौन असते. तो तटस्थ असतो, अशा तटस्थपणाचे मनोगत एका कवितेतून व्यक्त झाले. ‘गर्भाशय भाड्याने देता येते असे म्हणून ती स्वत:ला गर्भश्रीमंत समजायला लागली,’ अशा ओळींतून ‘सरोगेट मदर’चे वास्तव अधोरेखित झाले. ‘साखरसम्राटांच्या इंग्रजी शाळा आता ज्ञानदानाकरता अर्थकारणात रंगल्या’ अशी खंत विद्या पाटील यांच्या कवितेतून व्यक्त झाली.

प्रत्येकच क्षणाला येथे कोसळते हदय कुणाचे
गर्दीत असूनही मजला वाटते कसे वनवासी,
असे दु:ख प्रदीप पाटील यांनी मांडले.

‘चारा, सिमेंट, कोळसा सारेच खाणारे राजकारणी’ हे सटायर डॉ. के. शेख यांनी मांडले. मटकरी, भगवान फाळके, वर्षा सय्यद, माया धुक्क्ड, महेश कराडकर, शशांक शिंदे, एकनाथ आव्हाड, मुमताज पीरभॉय, सय्यद असीम, सुरेखा पांढरीपांडे, अशोक नाईक आदींनीही कविता सादर केल्या.