आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sant Namdev Family Memebers Present In Ghuman Panjab

साहित्य संमेलन : नामदेवांच्या वंशजाचे पंजाबने ठेवले स्मरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संत नामदेवनगरी, घुमान, पंजाब - संत नामदेवांच्या पंजाबमधील घुमान नगरीत मराठी साहित्य संमेलनाचा जागर होत असताना, खुद्द संत नामदेवांचे वंशजही घुमानमध्ये उपस्थित आहेत. पंजाब सरकारच्या विशेष निमंत्रणावरून संत नामदेवांचे १६ वे वंशज कृष्णदास सपत्नीक घुमानमध्ये आले आहेत. ‘दिव्य मराठी’शी संवाद साधताना कृष्णदास म्हणाले,‘‘माझे भाग्य थोर म्हणून मला संत नामदेवांच्या वंशात जन्म लाभला.
लहानपणापासून भजन, कीर्तन, प्रवचन हाच आमचा श्वास आणि ध्यास आहे. माझी मुलेही नामदेवांच्या रचनांचेच कीर्तन करतात. आमचे वास्तव्यही पंढरपूरजवळच्या नामदेव मंदिरानजीकच असते. आमची दखल आत्ताआत्तापर्यंत कुणीच घेतली नव्हती; पण २००६ मध्ये संत नामदेवांची ६५० वी जयंती होती तेव्हा पंजाब सरकारने मला शोधून काढले आणि खास निमंत्रण देऊन मला घुमान येथे आमंत्रित केले होते.
माझा विशेष सन्मान त्यांनी केला. त्यानंतर दरवर्षी मी यात्राकाळात घुमान येथे दर्शनाला येतो. आता माझे वय ७५ हून अधिक आहे. घरीदारी सतत चिंतन, मनन सुरू असते.” नव्या पिढीविषयी कृष्णदास म्हणाले, ‘‘नवी पिढी आमच्याही घरात आहे; पण एकूणच माध्यमांनी आणि चंगळवादाने जगणे व्यापून टाकले आहे.
नव्या पिढीला त्याची भुरळ पडते. पण जीवनाचा नेमका आवाका, महत्त्व यापासून ही पिढी दूर जाते आहे, असे मात्र मला सांगावेसे वाटते. दूरवरच्या पंजाब सरकारने नामदेवांचे वंशज म्हणून मला मान दिला, पण राज्य सरकारने मात्र कधी दखलही घेतली नाही, मात्र मी त्याची खंत बाळगत नाही,” ते म्हणाले.