आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलन : मराठी विज्ञानभाषाही व्हावी : शरद पवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संत नामदेव नगरी, घुमान, पंजाब - ही ज्ञानभाषा आहेच, पण आधुनिक युगात ती विज्ञानभाषाही व्हावी, अशी अपेक्षा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी संमेलनात बोलताना व्यक्त केली.

‘मराठी भाषेपासून नवी पिढी दुरावत आहे कारण मराठी आधुनिकतेची कास धरत नाही. माहिती-तंत्रज्ञान-विज्ञानाच्या आजच्या युगात ज्ञानभाषा असणाऱ्या मराठीने ‘विज्ञानभाषा’ बनले पाहिजे, असे पवार म्हणाले. ज्ञानकोशकार केतकर, विश्वकोश-सांस्कृतिक कोशकार तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मागील पिढीत मराठी भाषेच्या कक्षा विस्तारल्या तर आज डॉ. जयंत नारळीकर, बाळ फोंडके, निरंजन घाटे हे लेखक असा प्रयत्न करत आहेत.
साहित्य अकादमीने नुकताच डॉ. नारळीकरांच्या पुस्तकाचा गौरव केला. तसेच आधुनिक देशीवाद मांडणाऱ्या भालचंद्र नेमाडेंना ज्ञानपीठाने गौरवले. परंपरेचा मागोवा घेत आधुनिक विज्ञाननिष्ठता जपणाऱ्या या लेखकांचा गौरव हा एक शुभसंकेत आहे, असेही पवार म्हणाले.
मराठी भाषेची सद्यस्थिती मांडताना पवार म्हणाले,‘१९६० च्या सुमारास मुंबईत मराठी माणसांची टक्केवारी ५२ होती. आज हे प्रमाण २२ टक्कयांवर घसरले आहे. मराठीची स्थिती खालावते आहे. मराठी शाळा हद्दपार होत आहेत.
मराठी बोलणे, लिहिणे कमीपणाचे वाटू लागले आहे. पालकांचा दृष्टीकोनही बदलत आहे. मराठी भाषक संस्कृती जतन करण्यातले हे अडथळे आहेत. ते दूर करणे गरजेचे आहे. मराठी भाषेला ‘अभिजात भाषे’चा दर्जा मिळावा, यासाठी राज्य सरकारने सर्व औपचारिकता पूर्ण केली आहे. आता केंद्र सरकारने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले.

‘घुमान’ची निवड योग्यच :

मराठी साहित्य संमेलनासाठी आयोजकांनी ‘घुमान’ची निवड केली, ती सर्वार्थाने योग्यच आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सदानंद मोरे यांची निवड औचित्यपूर्ण आहे. विश्वात्मक शांतीचा संदेश देणाऱ्या संत नामदेवांच्या कार्याचा वारसा ते चालवत आहेत, पवार म्हणाले.