आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Announcement In Ghuman Sahitya Samelan By Politician

साहित्य संमेलन : बादल गरजले, गडकरींचा गडगडाट; घोषणांचा पाऊस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संतश्रेष्ठ श्री नामदेव नगरी, घुमान - पंजाबातील घुमानमध्ये ८८ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून शुक्रवारी घोषणांचा पाऊस पडला. उद््घाटन सोहळ्याचे अध्यक्ष व राज्याचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी संत नामदेव महाविद्यालय, संत नामदेव अध्यासनाची घोषणा केली, तर उद््घाटक व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घुमान-पुणे राष्ट्रीय महामार्ग, पंजाबी संमेलन नागपुरात भरवण्याच्या घोषणा केल्या.
पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यातील घुमान येथे साहित्य संमेलनाचे रसिकांच्या उदंड गर्दीत उद््घाटन झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, मावळते संमेलनाध्यक्ष फ. मुं. शिंदे, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. या वेळी बादल म्हणाले, गुरू गोविंदसिंगजी महाराष्ट्रातील नांदेड, तर संत नामदेव घुमान येथे ब्रह्मलीन झाले हे भावनिक नाते आहेच.
महर्षी वाल्मीकींनी रामायण लिहिले ते त्या वेळच्या पंजाबमध्ये, श्रीकृष्णाने भगवद््गीताही पंजाबमधील कुरुक्षेत्रावरच सांगितली. महाराष्ट्र व पंजाबचे भावनिक, खासगी, पुरातन संबंध आहेतच. त्याला साहित्यिक संबंधांचीही किनार मिळाली आहे. उभयपक्षी ऋणानुबंध दृढ होतील, अशी ग्वाही बादल यांनी दिली. दोन्ही राज्यांतील नेत्यांचे संबंधही नेहमीच मैत्रीचे राहिले. पंजाबने मागितले ते ते नितीन गडकरी आणि शरद पवार यांनी भरभरून दिले, अशा शब्दांत बादल यांनी उभयपक्षी संबंधांचा गौरव केला.
घुमान येथे नामदेव महाविद्यालय :

घुमान येथील प्राथमिक शाळा बारावीपर्यंत केली जाईल. तसेच गावात संत नामदेव कला व वाणिज्य कॉलेज, गुरू नानकदेव विद्यापीठात संत नामदेव अध्यासनाची स्थापना करण्याची घोषणा मुख्यमंत्री बादल यांनी या वेळी केली.
पुणे ते घुमान राष्ट्रीय महामार्ग :

पंजाबात संतविचारांचे कार्य नानकदेव यांनी केल्याचे सांगून अमृतसर-घुमान-पुणे-हरगोविंदपूर या १८०० कोटी खर्चाच्या चौपदरी राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी देत असल्याचे गडकरी यांनी जाहीर केले.
पुढचे पंजाबी संमेलन नागपुरात :
बादल यांनी त्यांच्या भाषणात पंजाबी साहित्य संमेलन महाराष्ट्रात व्हावे, अशी इच्छा बोलून दाखवली होती. तो धागा पकडून गडकरी यांनी यापुढचे पंजाबी साहित्य संमेलन नागपुरात घेणार असल्याचे जाहीर केले.