आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलन : ज्ञान अन‌् उत्सव ही सांस्कृतिक सिद्धीच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुंडलिक वरदा हरी विठ्ठलऽऽ
श्री ज्ञानदेव तुकाराम ।।
संस्कृतीला ओळख देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत. त्यांच्यापैकी संमेलन एक साहित्य संमेलन म्हणजे मराठी अस्मितेचा उत्सवी आविष्कार. या संमेलनात साहित्याची चर्चा होणार हे उघडच आहे; पण या प्रकारच्या चर्चेला, ज्ञानव्यवहाराला उत्सवी वातावरण लाभण्यात गैर काय आहे? उलट, ज्ञान आणि उत्सव यांनी एकत्र नांदणे ही आमची सांस्कृतिक सिद्धी आहे. संत ज्ञानेश्वर आपल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाला ज्ञानाची दिवाळी म्हणतात, तर संत नामदेवराय म्हणतात,
‘नाचू कीर्तनाचे रंगी ।
ज्ञानदीप लाऊ जगी।’
आम्ही वाचू पण आणि नाचू पण, याचे सविस्तर विवेचन मी करणार आहे. मुद्दा काय आहे की ज्ञानाचा व्यवहार आणि आनंदोत्सवाचा व्यवहार यात विसंगती नाही. मग चर्चा होऊ शकते ती कशाची, तर संमेलन कोठे व्हावे, अध्यक्षाची निवड अविरोध व्हावी किंवा निवडणुकीने व्हावी अशा गोष्टींबद्दल.
या वर्षी संमेलन कोठे व्हावे याची चर्चा खूप झाली. या प्रकारावर माझी पहिली प्रतिक्रिया होती की संमेलन घुमानला घ्यायचे नाही तर कोठे घ्यायचे? निदान ‘महाराष्ट्र’ या शब्दाच्या अर्थाला तरी जागा. आमच्या महानुभाव सांप्रदायिकांनी ‘महाराष्ट्र म्हणजे महंत राष्ट्र’ असे फार पूर्वी म्हणून ठेवले आहे आणि त्याची व्याप्तीही सांगितली आहे. जेथे जेथे मराठी भाषा बोलली जाते, तो देश म्हणजे महाराष्ट्र. आता पंजाबात मराठी भाषा बोलली जात नसेल; पण मराठी भाषा बोलणाऱ्या एका संताने येथे येऊन येथील भाषा आत्मसात केली, तिच्यात रचना करून येथील लोकांची मान्यता मिळवली, त्यांच्यावर प्रभाव पाडला, ही काय लहानसहान गोष्ट आहे? संत नामदेवरायांमुळे दैवत श्रीविठ्ठल शीख धर्माच्या पवित्र प्रमाणग्रंथात गुरू ग्रंथसाहिबात ‘बिठलू’ या नावाने प्रविष्ट झाले आहे आणि तोच महाराष्ट्र आणि पंजाब, मराठे आणि शीख यांच्यातील अनुबंधाचा मूळ पाया आहे. धर्माधर्मांमधील भेदांच्या पलीकडे जायची व त्यासाठी वेळप्रसंगी त्या त्या धर्मांतील कर्मठांवर टीका करण्याची गरज भारतात पहिल्यांदा नामदेवांनी सांगितली व समकालीन हिंदू आणि मुसलमान यांना खडे बोल ऐकवले. हेच नंतर कबीरांनी केले, एकनाथांनी केले आणि गुरू नानकदेवांनीही केले. मला येथे हे निदर्शनास आणून द्यायचे आहे की जे स्थान उत्तरेत पंजाबचे आहे, तेच दक्षिणेत महाराष्ट्राचे आहे.
मराठ्यांचे साम्राज्य लयास जात असतानाच महाराजा रणजितसिंगांमुळे शिखांच्या राज्याचा उदय झाला. त्यामुळे संपूर्ण भारतावर राज्य करण्याचे ब्रिटिशांचे स्वप्न अर्धशतक तरी लांबणीवर पडले, जे त्याआधी मराठ्यांमुळे किमान तितकाच काळ लांबले होते. अशा प्रकारे मराठे आणि शीख यांचे ऐतिहासिक कार्य परस्परपूरक ठरते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी बलिदान करण्यात पंजाब आणि महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहिले होते. लाला लजपतराय आणि लोकमान्य टिळकांची नावे बरोबरीने घेतली जातात.
मराठे ही जशी विजेत्यांची आणि प्रशासकांची जमात आहे, तशीच ती साहित्यकारांची, लेखक-कवींचीही जमात आहे. मराठ्यांच्या या साहित्यभानाला एव्हाना संस्थात्मक रूप येऊन न्या. रानड्यांनी मराठी ग्रंथकारांचे संमेलनही भरवले होते. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ म्हणजे भगवदगीतेवरील मराठी भाष्य आहे. गीतेवरील संस्कृतेतर भाषांमधील ते पहिले भाष्य आहे, एवढे सांगितले तरी त्याचे महत्त्व अधोरेखित होऊ शकते.
सविस्तर भाषण : दिव्य मराठी डॉट कॉमवर