आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील 22 बहाद्दरांना शौर्य पुरस्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जिवाची पर्वा न करता अतुलनीय शौर्य दाखवणा-या देशातील 22 चिमुरड्यांना शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुरात बुडणा-या आपल्या मित्रांचे प्राण वाचवताना स्वत:चा प्राण गमवावा लागलेल्या मिझोरमच्या 15 वर्षीय रोमदिनथरा या बहाद्दराला मरणोत्तर शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते 63 व्या प्रजासत्ताकदिनी हे पुरस्कार प्रदान केले जातील. पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्राच्या समीप अनिल पंडितचाही समावेश आहे.

शौर्य पुरस्कार मिळालेल्यांमध्ये चार मुलींचाही समावेश आहे. संकटसमयी जीव धोक्यात टाकून साहस दाखवणा-या धाडसी मुला-मुलींना दरवर्षी हे पुरस्कार देण्यात येतात. बालकल्याण परिषदेने या पुरस्कारांची घोषणा केली. अन्य विजेत्यांमध्ये देवांश तिवारी आणि मुकेश निषाद (छत्तीसगड), लालरीन्हुला (मिझोरम), इ. सुगंथन (तामिळनाडू), रमीथ के, मेबिन सारिअ‍ॅक, विष्णू एम.व्ही. (केरळ), विश्वेंद्र लोहकना, सत्येंद्र लोहकना, पवनकुमार कनौजिया, विजयकुमार सैनी (उत्तर प्रदेश) आणि सुहाई एम. (कर्नाटक) यांचा समावेश आहे.

दिल्लीतील एका बालगृहामध्ये संचालक आणि कर्मचा-यांकडून होत असलेल्या शारीरिक आणि लैंगिक शोषणाचा पर्दाफाश करणा-या एका 17 वर्षीय मुलीची प्रतिष्ठेच्या गीता सन्मान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तेथील छळ असह्य झाल्यामुळे बालगृहातून पळून जाऊन तिने एक स्वयंसेवी संस्था गाठली. नंतर तिला बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. तिच्या धाडसामुळे राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाला त्या बालगृहात चौकशी समिती पाठवण्यास भाग पाडले आणि तेथील बालकांची विक्री, लैंगिक शोषण, बळजबरीने बालमजुरी अशी अनेक कृष्णकृत्ये उजेडात आली. तिच्या या धाडसामुळे देशभरातील बालसुधारगृहांमध्ये चिमुरड्यांचा होत असलेल्या शारीरिक, मानसिक आणि लैंगिक छळावर नव्याने प्रकाश पडला होता.

तरंग मिस्त्रीला प्रतिष्ठेचा ‘भारत सन्मान’
धौलती सणाच्या दिवशी नर्मदा नदीच्या प्रवाहात स्नान करताना वाहून जात असलेल्या चार लोकांचे प्राण वाचवणा-या गुजरातच्या 17 वर्षीय तरंग अतुलभाई मिस्त्री या बहाद्दर किशोराची प्रतिष्ठेच्या भारत सन्मान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हे चारही जण 20 ते 25 फूट पाण्यात बुडताना तरंगने त्यांना वाचवले होते.

मणिपूरच्या लहानग्या कोराँगम्बाचा सन्मान
या वर्षीच्या शौर्य पुरस्कार विजेत्यांमध्ये मणिपूरच्या सात कोराँगम्बा कुमानच्या शौर्याची दखल घेत तिला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. घरात कुणीही नसताना स्वत:च्या घराला आग लागल्यानंतर जीव धोक्यात घालत अतुलनीय शौर्य दाखवून छोट्या बहिणीचे प्राण वाचवले. तिच्या या धाडसाने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या धाडसाबद्दल तिची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
तिने टाळला स्वत:चाच बालविवाह
राजस्थानमधील चौदावर्षीय सपना कुमारी मीना या चिमुरडीने आपल्या वडिलांविरुद्धच बंड पुकारण्याची हिंमत दाखवली. तिचे वडील तिच्या अल्पवयीन बहिणीप्रमाणे तिचाही बळजबरीने बालविवाह लावून देत होते. तिने थेट जिल्हाधिका-यांकडे तक्रार करून आपला बालविवाह रोखण्याची विनंती केली. जिल्हाधिका-या ंनी उपविभागीय अधिका-या ला पाठवून तिचा बालविवाह रोखला.