आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महानगरांत 53 टक्के पाण्याचा अपव्यय; पाणी वाचवण्याची मोहीम राबवणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- महानगरांमध्ये एकीकडे पाणीटंचाईचे संकट असतानाच एकूण पाण्याच्या 53 टक्के पाण्याचा महानगरांमध्ये अपव्यय होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. केंद्र सरकार आणि आशिया विकास बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पाण्याचा सर्वात जास्त अपव्यय देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत होतो.
दिल्लीत 52.4 टक्के पाणी वाया जाते, तर बंगळुरूमध्ये 50.9 टक्के पाण्याचा अपव्यय होतो. जलसंपदा खात्याने ही बाब गांभीर्याने घेतली असून या वर्षीच्या पावसाळ्यात पाणी साठवण्याची तसेच पाण्याच्या इतर स्रोतांची जपणूक करण्याची मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जमिनीतील पाण्याचा साठा कायम ठेवण्यासाठी अभियान राबवले जाणार आहे.
महानगरांमध्ये 13 ते 53 टक्के पाणी वाहून जात असल्याने सरकारला त्यापासून मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावे लागत असल्याचे एका अधिकाºयाने सांगितले. दिल्ली आणि बंगळुरूमध्येच (सुमारे 31 टक्के) मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होतो. त्यामुळे सर्व शहरांत पाण्यासाठी मीटर लावण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, त्याचे आतापर्यंत योग्य परिणाम मिळाले नसल्याचे समोर आले आहे. 2006 या वर्षी देशातील 91 टक्के जनतेलाच पिण्याचे पाणी उपलब्ध झाले होते. यापैकी सुमारे 61 टक्के लोकांना पाइपच्या मदतीने पिण्याचे पाणी मिळाले तर उर्वरित जनतेला इतर स्रोतांद्वारे पाणी उपलब्ध झाले.
केंद्र सरकारच्या एका अध्ययनानुसार, विविध राज्य तसेच शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी आणि त्यांचे वितरण एकसारखे नाही. झारखंडमधील चासमध्ये हे प्रमाण केवळ 9.3 टक्के एवढे आहे, तर बोकारोमध्ये 99.5 एवढे आहे. एका शहरातील विविध भागांतील पाण्याचे वितरणही एकसारखे नाही. दिल्लीतील कँट परिसरात एका व्यक्तीला सुमारे 509 लिटर पाणीपुरवठा होतो, तर नरेलामध्ये हे प्रमाण 31 लिटर, नजफगड-द्वारकामध्ये 74 लिटर, करोलबागमध्ये 337 तर एनडीएमसीमध्ये 462 लिटर एवढे आढळले आहे. 2001 च्या जनगणनेनुसार शहरी भागात 68.66 टक्के लोकांकडे पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा होतो. अन्य नागरिक मात्र आजही पाण्यासाठी अन्य स्रोतांवर अवलंबून असल्याचे आढळून आले होते.