आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political Turmoil In Bihar As Jitanram Manzi Refuse To Resign

नरेंद्र मोदींच्या आशीर्वादानेच मांझींचे बंड, JDU चा आरोप, मांझी-नितीश राज्यपालांकडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल फोटो- जितनराम मांझी यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यावर नितीशकुमार यांनी अशा प्रकारे शुभेच्छा दिल्या होत्या.)
पाटणा - बिहारमधील राजकीय नाट्य दिल्लीत लिहिण्यात आले होते. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनीच ऑपरेशन जितनराम मांझी सुरु केले होते. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आशीर्वाद आहे. काल मोदींची भेट घेतल्यावर मांझी ज्या आविर्भावात बोलत होते त्यावरुन याचा अंदाज येतो, असे जनता दल युनायटेडचे नेते के. सी. त्यागी यांनी म्हटले आहे.
जनता दलाने राज्यपाल केशारीनाथ त्रिपाठी यांनाही अल्टिमेटम दिला आहे. 48 तासांत नितीशकुमार यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी संधी देण्याची मागणी करण्यात आली आहे. दिल्लीला उद्या जाणाऱ्या एका विमानाच्या 140 जागा पक्षाने बुक केल्या असून राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची भेट घेण्याची योजना आखली आहे. यासाठी सर्व 130 आमदारांना नितीशकुमार दिल्लीला घेऊन जाणार आहेत. राज्यपालांनी संधी दिली नाही तर राष्ट्रपतींकडे जनता दल दाद मागणार असल्याचे वृ्त्त आहे.
दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांना जनता दल युनायटेड या त्यांच्याच पक्षाने निलंबित केले आहे. याची घोषणा झाल्यावर मांझी राज्यपाल केशारीनाथ त्रिपाठी यांची भेट घेण्यासाठी गेले. दुसरीकडे नितीशकुमार हेही पक्षाच्या आमदारांसह राज्यपालांना भेटायला गेले आहेत.
आता जितनराम मांझी यांचे पद गेल्यातच जमा आहे. कायद्याप्रमाणे त्यांना आता जनता दल युनायटेडच्या एकूण 111 आमदारांपैकी एक तृतियांश म्हणजे 74 आमदार आपल्याकडे खेचावे लागतील. सध्या मांझींना 14 आमदारांचा पाठिंबा आहे. आणखी 22 आमदार त्यांना पाठिंबा देऊ शकतात, असे सूत्रांकडून समजते. परंतु, तरीही ही संख्या एक तृतियांश संख्येपर्यंत जात नाही.
सर्वांच्या नजरा राज्यपालांवर
बिहारच्या राजकारणात आज सर्वांच्या नजरा राज्यपालांवर आहेत. राज्यपाल आज पाटण्यात पोहोचले आहेत. त्यांच्याकडे पश्चिम बंगालचीही जबाबदारी आहे. जितनराम मांझी आणि नितीशकुमार दोघेही त्यांची भेट घेणार आहेत. मांझी यांनी बहुमत असल्याचा दावा यापूर्वी केला होता. पण आता त्यांना पक्षातून काढले असल्याने बहुमत सिद्ध करणे शक्य नाही. ते राज्यपालांना राजीनामाही देऊ शकतात. नितीशकुमार यांनी 130 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. आमदारांची यादी घेऊन ते राज्यपालांचा भेट घेतली.
जनता दल युनायटेडच्या आमदारांनी माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांची पक्षनेतेपदी निवड केली आहे. नितीशकुमार आज सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. परंतु, बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री जितनराम मांझी अजूनही माघार घेण्यास तयार नाहीत. त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. सभागृहात नितीशकुमारांचे बहुमत सिद्ध झाल्यावरच राजीनामा देणार असल्याचे ठामपणे सांगितले आहे.
यासंदर्भात बोलताना जितनराम मांझी म्हणाले, की सध्या मी मुख्यमंत्री आहे. नितीशकुमार जोपर्यंत बहुमत सिद्ध करीत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्री असेल. नितीशकुमार राजकारण करण्याशिवाय राहू शकत नाहीत. त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे.
यासंदर्भात जनता दल युनायटेडचे प्रदेशाध्यक्ष बाशिष्ठ नारायणसिंह म्हणाले, की नितीशकुमार आज राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. पक्षाच्या शिष्टमंडळाने रविवारी 130 आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव यांचे पत्र राज्यपालांना दिले आहे. आरजेडी, कॉंग्रेस, सीपीआय आणि अपक्ष आमदारांना जोडून आमचे 130 चे संख्याबळ तयार होत आहे. त्यांनी नितीशकुमार यांची नेतेपदी निवड केली आहे.
पुढील स्लाईडवर, नितीशकुमार यांच्या निवासस्थानी दुचाकीवर येताना आमदार...राजभवनाची सुरक्षा वाढवली... राज्यपाल पश्चिम बंगालमधून बिहारमध्ये आले...नितीशकुमारांची निवासस्थानी उसळलेली गर्दी...