पाटणा :राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव हे जमीन घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप भाजपने केल्यानंतर मंगळवारी प्राप्तिकर विभागाने कथितरीत्या त्यांच्याशी संबंधित २२ ठिकाणांवर छापे टाकले होते. या आरोपांमुळे नाराज झालेल्या राजदच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी भाजपच्या कार्यालयावर दगडफेक केली. दुसरीकडे, भाजप कार्यकर्त्यांनी त्याला उत्तर दिले.
दगडफेकीत अनेक वाहनांच्या काचा फुटल्या. त्यात भाजपचे ६ कार्यकर्ते जखमी झाले.
बुधवारी सकाळी राजदचे सुमारे २५० कार्यकर्ते येथील वीरचंद पटेल मार्केटमधील भाजपच्या कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्याविरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे भाजप कार्यकर्तेही बाहेर आले. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. राजद कार्यकर्त्यांनी दगडफेक सुरू केली, त्यामुळे कार्यालयाच्या बाहेर उभ्या असलेल्या अनेक गाड्यांचे नुकसान झाले, असा आरोप भाजप नेत्यांनी केला. सुशील मोदी यांनी गेल्या महिन्यात लालू आणि त्यांच्या मुलांवर अनेक आरोप केले आहेत.
शहराचे पोलिस अधीक्षक चंदन कुशवाह यांनी सांगितले की, काही लोकांनी भाजपच्या कार्यालयाला घेराव घातला होता. त्या वेळी दगडफेक झाल्याचेही म्हटले जात आहे. सध्या स्थिती नियंत्रणात आहे. ज्या लोकांनी हा प्रकार घडवला त्यांची ओळख पटवली जात आहे.
लालूंच्या सांगण्यावरूनच हल्ला
लालू यादव यांच्या सांगण्यावरूनच हा हल्ला झाला आहे. राजदने गुन्हा केला आहे. त्यांनी कायदा हातात घेतला आहे. नितीशकुमार कायद्याच्या राज्याची गोष्ट करतात. हेच का कायद्याचे राज्य? आम्ही हे प्रकरण कायद्याच्या दारापर्यंत घेऊन जाऊ. त्याचबरोबर जनतेच्या न्यायालयातही जाऊ’
-नित्यानंद राय, बिहार भाजप अध्यक्ष
लालू यादव यांच्या सांगण्यावरूनच हा हल्ला झाला आहे. राजदने गुन्हा केला आहे. त्यांनी कायदा हातात घेतला आहे. नितीशकुमार कायद्याच्या राज्याची गोष्ट करतात. हेच का कायद्याचे राज्य? आम्ही हे प्रकरण कायद्याच्या दारापर्यंत घेऊन जाऊ. त्याचबरोबर जनतेच्या न्यायालयातही जाऊ’
-नित्यानंद राय, बिहार भाजप अध्यक्ष
सुशील मोदी म्हणाले, ‘ईंट का जवाब पत्थर से देंगे’ :सुशील मोदी म्हणाले की, ‘आमचा पक्ष विटेचे उत्तर दगडाने देणे जाणतो, पण आम्ही हिंसेचे प्रत्युत्तर हिंसेने देणार नाही. आम्ही चूप बसणार नाही. आमचे ६ लोक जखमी झाले आहेत. आम्ही जनतेकडे जाऊ.’ राजदच्या कार्यकर्त्यांना पोलिसांचा पाठिंबा मिळाला असल्याचा आरोप करून मोदी म्हणाले की, भाजप कार्यालय ‘नो एंट्री झोन’मध्ये आहे. या भागात कुठलीही मिरवणूक किंवा निदर्शने होऊ शकत नाहीत. मग राजदचे लोक कसे पोहोचले? असा प्रश्न त्यांनी विचारला.