पाटणा - पाटणा उच्च न्यायालयाने दारूबंदीविषयक कायदा रद्द केल्यानंतर दोन दिवसांतच बिहारमध्ये नव्या कायद्याचा मसुदा सादर झाला आहे. गांधी जयंतीनिमित्त राज्य सरकारने दारूबंदीवर अधिक कठोर कायदा आणला आहे. ज्यांच्या घरात मद्य आढळेल त्यांना अटक करण्याचा अधिकार या नव्या कायद्यात प्रशासनाला देण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर रविवारी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
बिहार प्रोहिबिशन अँड एक्साइज अॅक्ट २०१६ अंतर्गत राज्यामध्ये मद्यविक्री आणि मद्यप्राशनाला १००% बंदी घालण्यात आली आहे. भारतीय व परदेशी मद्यांवर ही बंदी असेल असे यात म्हटले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची विशेष बैठक रविवारी आयोजित करण्यात आली होती. यात मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने दारूबंदी कायद्याला राज्य सरकार अमलात आणेलच अशी शपथ ग्रहण करण्यात आली. राज्यात सकारात्मक सामाजिक बदलासाठी हे अत्यावश्यक असण्यावर सहमती झाली. पूर्वीच्या कायद्याच्या मसुद्यातील अनेक तरतुदी नव्या कायद्यात जशास तशा स्वीकारल्या आहेत. शिवाय काही कठोर तरतुदींचा यात समावेश केला आहे.
४ ऑगस्ट रोजी प्रतिनिधीगृहांनी कायदा संमत केला होता : बिहार प्रोहिबिशन अँड एक्साइज अॅक्ट २०१६ ला बिहारच्या दोन्ही प्रतिनिधीगृहांनी ४ ऑगस्ट रोजी संमत केले होते. ७ सप्टेंबर रोजी राज्यपाल रामनाथ कोविंद यांनी त्यावर स्वाक्षरी केली होती. १४ सप्टेंबर रोजी हा कायदा २ ऑक्टोबरपासून अमलात येईल, असे राज्य सरकारने म्हटले होते.
का ठरवला कायदा रद्द : पाटणा उच्च न्यायालयाने शुक्रवार, ३० सप्टेंबर रोजी मद्यबंदी कायदा रद्द ठरवला. हा कायदा घटनाबाह्य असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
असे आहेत नवे बदल
- मद्यविक्री व प्राशन करणाऱ्यांना होणाऱ्या कैदेचा अवधी वाढवला आहे.
- दंडाची रक्कम वाढवली आहे.
- घरात मद्याची बाटली आढळल्यास त्या घरातील प्रत्येक प्रौढाला अटक करण्यात येईल.
- सार्वजनिकरीत्या मद्यपान केल्यास सर्वांना दंड भरावा लागेल.
२ ऑक्टोबरपासून अंमलबजावणीही सुरू
एरवी कोणत्याही नव्या निर्णयाविषयी माध्यमांशी मुख्य सचिव ब्रिजेश मेहरोत्रा संवाद साधतात. मात्र मद्यबंदी कायद्याविषयी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी माईक हाती घेतला. २ ऑक्टोबरपासूनच हा कायदा अमलात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.राष्ट्रपिता महात्मा गांधींना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करायची असल्यास हाच दिवस कायद्याच्या अंमलबजावणीसाठी योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. बिहारमध्येच गांधींनी चंपारण्य सत्याग्रह केल्याच्या स्मृतीही नितीश यांनी या वेळी जागवल्या. शुक्रवारी पाटणा उच्च न्यायालयाने दारूबंदी कायदा रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्याच्या दोन दिवसांतच नवा कायदा अमलात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले. दरम्यान, राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे.