आरा - यूएई दौरा उरकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी बिहारच्या निवडणूक प्रचारात उडी घेतली. गेल्या एका महिन्यात तिसऱ्यांदा ते बिहारमध्ये दाखल झाले. आरामध्ये त्यांनी १० राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या कोनशिलेचे अनावरण केले. नंतर रमना मैदानात झालेल्या जाहीर सभेतही त्यांनी जोरदार आश्वासने दिली. ते म्हणाले, मी आज आश्वासने पूर्ण करण्यासाठीच आलो आहे. सांगा किती पाहिजेत? मी ५० हजार कोटी रुपये म्हणालो होतो... ६० हजार कोटी, ७० हजार कोटी? मी सव्वा लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा करत आहे.
मोदी म्हणाले, बिहारचा कायापालट करण्यासाठी केंद्र सरकार वाटेल ते करेल. हे वाक्य उच्चारताच लोकांनी "मोदी... मोदी' घोषणा सुरू केल्या. केंद्राचे हे नवे पॅकेज सध्या दिलेल्या ४० हजार कोटी रुपयांव्यतिरिक्त असेल, असेही मोदींनी सांगितले. पंतप्रधानांच्या या घोषणेसोबतच बिहारमध्ये यावरून राजकारण तापले. सत्ताधारी जदयू नेते के. सी. त्यागी यांनी हे पॅकेज म्हणजे राजकीय लाच असल्याचे सांगितले. याउलट भाजप नेत्यांना मात्र या घोषणेमुळे राज्यात निवडणुकीत मोठा लाभ मिळेल, अशी खात्री वाटत आहे.
जंगलराजची पुन्हा मनात भीती... जंगलराजची भीती लोकांच्या मनात घर करू लागली आहे, असे सांगून बिहारमधील गुन्हेगारीची आकडेवारीची मोदींनी लोकांसमोर मांडली. दंगलींमध्येही
प्रचंड वाढ झाल्याचे दाखले मोदींनी दिले.
पुन्हा स्वप्न....!
मोदींच्या घोषणेवर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. टि्वटरवर ते म्हणाले, बिहारी जनतेसाठी वारंवार याचक म्हणून कुणाच्या दारी जावे लागले तर संकोच वाटणार नाही. मात्र, विशेष पॅकेज मागणी नव्हे, हक्क आहे. घोषणाबाजी करून मोदी पुन्हा स्वप्न दाखवत आहेत.
ही तर निव्वळ दिशाभूल : लालू
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष व नितीश यांचे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या महाआघाडीचे सदस्य लालूप्रसाद यादव यांनीही मोदींवर लगेच टीका केली. विशेष पॅकेजचे हे आश्वासन म्हणजे दिशाभूल असून हे केवळ मृगजळ असल्याचे ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीतही काळा
पैसा भारतात आणून प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा करू, असे आश्वासन मोदींनी दिले होते.
अहंकारी नितीश यांना निरोप द्याच...
सहरसा येथे पटेल मैदानावर आयोजित परिवर्तन सभेत मोदींनी नितीश यांना लक्ष्य केले. अहंकारी नितीश यांना इतरांचे दु:ख काय समजणार, असा प्रश्न करून २००८ मध्ये कोसी नदीच्या पुरात हजारो बिहारी नागरिक बेघर झाले. तेव्हा गुजरात सरकारने पूरग्रस्तांसाठी ५ कोटी रुपये पाठवले हाेते, याची आठवण मोदींनी करून दिली. मात्र, ही मदत अहंकारी नितीश यांनी परत पाठवल्याचेही मोदींनी सांगितले. या अहंकारानेच पीडितांचे दु:ख वाढले. म्हणूनच नितीश सरकारला निरोप देण्याची वेळ आता आल्याचे मोदी म्हणाले.