पाटणा - राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य केले आहे. लालूप्रसाद यांनी ट्विटरवर म्हटले आहे की,"देश तोडण्याचा यांचा अजेंडा आहेच. कारण पीएमनी देशाची एकता आणि अखंडता अक्षुण्ण (अबाधित) ठेवण्याची शपथ घेतलेलीच नाही. शपथ घेतेवेळी पंतप्रधानांनी अक्षुण्णऐवजी अक्षण्ण असा उच्चार केला होता पण हिंदीत अक्षण्ण शब्दाचा काहीच अर्थ नाही. त्यामुळे त्यांनी घेतलेली शपथ वाया गेली आहे. पंतप्रधानांनी दुसऱ्यांदा शपथ घ्यायला हवी.'
लालू यांनी टि्वटरवर मोदींच्या शपथविधीचा व्हिडिओदेखील शेअर केला आहे. गेल्या शुक्रवारी मंत्रिपदाची शपथ घेतेवेळी लालूंचे मोठे चिरंजीव तेजप्रताप यांनी "अपेक्षित'शब्द "उपेक्षित' असा उच्चारला होता. त्या वेळी राज्यपाल रामनाथ कोविंद यांनी त्यांना अडवत पुन्हा शपथ घ्यायला लावली. त्यानंतर तेजप्रताप यांनी पुन्हा शपथ घेतली होती. हे प्रकरण सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे.