आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकालाचा परिणाम विधानसभेवर नाही - नितीशकुमार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - विधान परिषदेतील २४ जागांच्या निकालावरून विधानसभा निवडणुकीचे राजकीय भविष्य वर्तवले जाऊ नये, असे मत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी व्यक्त केले आहे. विधान परिषदेची निवडणूक ही विधानसभेप्रमाणे जनतेच्या मतांवरून ठरत नाही. त्यामुळे यातील विजयाचा विधानसभेच्या निकालावर परिणाम होईल, असे अंदाजही बांधणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नुकताच बिहारमधील विधान परिषद निवडणुकांचा निकाल लागला. यात भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या मित्रपक्षाने २४ पैकी १४ जागांवर ताबा मिळवला आहे. या निकालावरून बिहारच्या विधानसभा निवडणुकीबाबतच्या चर्चांनाही आता ऊत आला आहे. याच पार्श्वभूमीवर नितीशकुमार यांनी बिहाराच्या सारन जिल्ह्यातील एका खासगी कार्यक्रमादरम्यान वरील वक्तव्य केले. विधान परिषदेची ही निवडणूक उपांत्य फेरी असल्याचे बिहारच्या राजकीय क्षेत्रात म्हटले जात होते. त्यामुळे यातील निकालास बरेच महत्त्व होते. दरम्यान, या निकालाचा पुढील राजकारणावर काहीच परिणाम होणार नाही. आपण सामान्यपणे आपले कार्य चालू ठेवू, असेही मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्पष्ट केले आहे.
"बरे झाले मोदींना बिहार लक्षात तरी आहे'
पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच बिहारचा दौरा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर नितीशकुमार यांनी त्यांच्यावर चांगलीच टीका केली आहे. ते म्हणाले, बरे झाले मोदींना बिहार लक्षात तरी आहे. त्यांनी बिहारला विशेष दर्जा तसेच मदतीचे पॅकेज देऊ असे म्हटले हाेते. परंतु हे आश्वासन पाळण्यात ते अयशस्वी ठरले आहेत. बिहार दौऱ्यात ते आता एखादे पॅकेज घोषित करतात की नुसतीच "पॅकेजिंग' करून जातात, यावर लक्ष असल्याचेही नितीश यांनी या वेळी म्हटले आहे.
काळ्या पैशाबाबतची आश्वासने हवेतच
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी नरेंद्र मोदी यांनी परदेशातील काळा पैसा परत आणून गरिबांच्या खात्यात १५ ते २० लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मोदी आता हे आश्वासन विसरले आहेत, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली.