Home | National | Bihar | RJD Prabhunath Singh guilty of murder

राजदचे प्रभुनाथ सिंह हत्याप्रकरणी दोषी; 22 वर्षे जुन्या प्रकरणी अटक

दिव्य मराठी नेटवर्क | Update - May 19, 2017, 01:56 AM IST

राष्ट्रीय जनता दलाचे माजी खासदार प्रभुनाथ सिंह यांना आमदार अशोक सिंह यांच्या हत्येच्या प्रकरणात हजारीबागच्या एका न्यायालयाने दोषी ठरवले आहे. अशोक सिंह यांची १९९५ मध्ये हत्या झाली होती.

 • RJD Prabhunath Singh guilty of murder
  हजारीबाग / पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे माजी खासदार प्रभुनाथ सिंह यांना आमदार अशोक सिंह यांच्या हत्येच्या प्रकरणात हजारीबागच्या एका न्यायालयाने दोषी ठरवले आहे. अशोक सिंह यांची १९९५ मध्ये हत्या झाली होती. या प्रकरणी अशोक सिंह यांचे बंधू दीनानाथ सिंह आणि साथीदार रितेश कुमार यांनाही दोषी ठरवण्यात आले आहे. प्रभुनाथ यांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले असून २३ मे रोजी या प्रकरणी शिक्षा सुनावली जाईल.
  अशोक सिंह हे झारखंडच्या सारण जिल्ह्यातील मशरकमधून जनता दलाचे आमदार होते. पटण्यात त्यांच्या घरी ३ जुलै १९९५ रोजी त्यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. १९९७ मध्ये पाटणा उच्च न्यायालयाच्या आदेशावरून हे प्रकरण पाटण्याहून हजारीबागला वर्ग करण्यात आले होते. प्रभुनाथ सिवानचे रहिवासी असून महाराजगंजमधून खासदार होते. २००९ मध्ये उमाशंकर सिंह यांनी प्रभुनाथ यांना पराभूत केले होते. २०१२ मध्ये त्यांनी जनता दल युनायटेडला सोडचिठ्ठी देत लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलात प्रवेश केला होता.

  लालूंची सभा आली अडचणीत
  भ्रष्टाचार आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात सध्या लालू प्रसाद यादव यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाकडून टांगती तलवार आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी २७ ऑगस्ट रोजी एका भव्य सभेचे आयोजन केले होते आणि या सभेच्या नियोजनाची संपूर्ण जबाबदारी लालूंनी प्रभुनाथ यांच्यावर सोपवली होती. मात्र, त्यांना अटक झाल्यामुळे लालूंना या सभेची नव्याने तयारी करावी लागणार आहे.
  लालूप्रसाद मुख्यमंत्री असतानाच केली होती हत्या
  १९९५ मध्ये लालूप्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री होते. त्या वेळी प्रभुनाथ हे लोकसभेवर होते. त्याच दरम्यान पाटण्याच्या एका फ्लॅटमध्ये आमदार अशोक सिंहांची हत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे, प्रभुनाथ यांना लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय मानले जाते. शिवाय, बिहारमध्ये मातब्बर मानले जाणारे आणि सध्या तुरुंगात असलेले नेते शहाबुद्दीन यांच्या मतदारसंघातून प्रभुनाथ यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक जिंकली होती. या दोन्हीही नेत्यांचे गुन्हेगारी जगताशी संबंध असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. दोघांमध्ये चांगलेच वैर होते. मात्र, लालूंच्या हस्तक्षेपामुळे नंतर दोघांतील संबंध सुधारले.

  बिहारच्या राजकीय घडामोडी बदलल्या
  प्रभुनाथ सिंहांच्या अटकेमुळे बिहारमधील राजकीय घडामोडी आता वेगाने हलत आहेत. शहाबुद्दीन यांच्याप्रमाणेच प्रभुनाथ हेसुद्धा बिहारमधील एक मातब्बर नाव होते. त्यांच्या अटकेनंतर भाजप नेते सुशील मोदी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यावर ट्विटरवरून हल्ला चढवला आहे. “नितीश आणि लालूंचे सर्वात विश्वासू नेते प्रभुनाथ सिंह यांना आज न्यायालयाने दोषी ठरवले असून २२ वर्षे जुन्या हत्येच्या प्रकरणात त्यांना शिक्षा झाली आहे’, अशा शब्दांत सुशील मोदी यांनी ट्विट केले आहे.

Trending