रायपूर (छत्तीसगड)- कॉंग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने नियुक्त केलेल्या राज्यपालांना नव्या भारतीय जनता पक्षप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारने राजीनामे देण्यासाठी सांगितले असून त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचे वृत्त आहे. या दरम्यान छत्तीसगडचे राज्यपाल शेखर दत्त यांनी राजीनामा दिला आहे. यापूर्वी उत्तर प्रदेशचे राज्यपाल बी. एल. जोशी यांनी राजीनामा दिला होता. आता आणखी कोणाची विकेट पडणार याकडे लक्ष लागले आहे.
शेखर दत्त यांनी बुधवारी रात्री राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना राजीनामा पाठवला. यासंदर्भात छत्तीसगड सरकारचे प्रधान सचिव आणि माहिती अधिकारी अमानसिंह यांनी एका ओळीच्या वक्तव्यात सांगितले, की दत्त यांनी राष्ट्रपतींकडे राजीनामा पाठवला आहे.
शेखर दत्त यांचा कार्यकाळ पुढील वर्षी संपणार होता. त्यांची जानेवारी 2010 मध्ये राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती. यापूर्वी त्यांनी संरक्षण सचिव आणि राष्ट्रीय संरक्षण उपसल्लागार म्हणूनही काम केले आहे. दत्त 1969 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
शेखर दत्त यांनी राजीनामा देण्यामागचे नेमके कारण दिलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने नियुक्त केलेल्या राज्यपालांवर केंद्र सरकारने राजीनाम्यांसाठी दबाव आणला आहे. यामुळे दत्त यांनी राजीनामा दिला असावा असे सांगण्यात येत आहे.