आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 Days, 11 Flag Offs: PM’S Infra Push In Poll Bound States

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदींची \'अच्छे दिन\'ची घाई, 10 दिवसांत उरकले 8 कार्यक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (गुरुवार) महाराष्ट्र आणि झारखंड दौर्‍यावर आहेत. दोन्ही राज्यांमध्ये मोदी तीन योजनांचे उदघाटन व भूमीपूजन करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी भूमीपूजन आणि उदघाटनांच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत. त्यांचे कार्यक्रम आगामी विधानसभा असलेल्या चार राज्यांमध्ये प्रामुख्याने होत आहेत. महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा व जम्मू आणि काश्मीर राज्यांमध्ये मोदींचे दौरे सुरु आहेत. गेल्या दहा दिवसांमध्ये मोदींनी या राज्यांमधील 8 योजनांचे भूमीपूजन किंवा उदघाटन केले आहे. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये आज कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमानंतर ही संख्या 11 वर पोहोचणार आहे. या राज्यांमध्ये लवकरच आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे, त्याआधी पंतप्रधानांच्या हस्ते योजनांची घोषणा, भूमीपूजन व उदघाटनाची घाई केली जात आहे. विशेष म्हणजे, नरेंद्र मोदी ज्या योजनांचे उदघाटन करत आहेत, त्या यूपीए सरकारच्या कार्यकाळात पूर्ण झालेल्या आहेत किंवा घोषणा झाली आहे. नागपूरमध्ये मेट्रो रेल्वेच्या भूमीपूजनाला राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित राहाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मोदींच्या महाराष्ट्र दौर्‍याला वादाची किनार देखील आहे.
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये पंतप्रधानांचे कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी सकाळी झारखंडमध्ये जातील. तेथे 765 केव्ही क्षमतेची रांची-धरमजयगड-सिपत ट्रान्समिशन लाईन राष्ट्राला अर्पण करतील. त्याशिवाय एनटीपीसीच्या उत्तर करनपूरा थर्मल प्रोजेक्टचे भूमीपूजन करणार आहेत. झारखंडनंतर पंतप्रधान महाराष्टातील विदर्भात येतील. पंतप्रधान पदी विराजमान झाल्यानंतर मोदी प्रथमच विदर्भात येत आहेत.
महाराष्ट्रात दुपारी पंतप्रधानांचे आगमन
गुरुवारी 3 दुपारी वाजता रांची येथून विमानाने आगमन होणार आहे. विमातळावरून ते 3.45 वाजता एनटीपीसीच्या कार्यक्रमासाठी मौद्याकडे हेलिकॉप्टरने प्रयाण करतील. मौदा येथील कार्यक्रम आटोपल्यावर 4.45 वाजता ते हेलिकॉप्टरने पुन्हा नागपूर विमानतळाकडे प्रयाण करतील. 5.15 वाजता ते नागपूर विमानतळावरून कस्तुरचंद पार्कच्या दिशेने प्रयाण करणार आहेत. 5.45 वाजता पार्कवर मेट्रो रेल्वेच्या भूमिपूजन समारंभात ते उपस्थित राहतील. कार्यक्रम आटोपून ते सायंकाळी 7.10 वाजता विमानतळावरून दिल्लीकडे प्रयाण करणार आहेत.

(छायाचित्र: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे जेएनपीटी सेझच्या उद्घाटन समारंभावेळी एकत्र आले होते)