Home »Business »Share Market» 10% Import Duty On Wheat, Tur Dal, Relief For Farmers

गहू, तूर डाळीवर 10 % आयात शुल्क, शेतकऱ्यांना दिलासा

नवी दिल्ली- केंद्र सरकारने गहू आणि तूर डाळीवर १० टक्के आयात शुल्क लावला आहे. या वर्षी या पिकांचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज असून नवे पीक दाखल होताच घाऊक बाजारातील दर कमी झाले आहे. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांना किमान हमी भाव (एमएसपी) देखील मिळत नाहीये. यामुळेच सरकारच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

वृत्तसंस्था | Mar 29, 2017, 06:19 AM IST

  • गहू, तूर डाळीवर 10 % आयात शुल्क, शेतकऱ्यांना दिलासा
नवी दिल्ली-केंद्र सरकारने गहू आणि तूर डाळीवर १० टक्के आयात शुल्क लावला आहे. या वर्षी या पिकांचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज असून नवे पीक दाखल होताच घाऊक बाजारातील दर कमी झाले आहे. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांना किमान हमी भाव (एमएसपी) देखील मिळत नाहीये. यामुळेच सरकारच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
अर्थ राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मंगळवारी लोकसभेत या निर्णयाची घोषणा केली. १७ मार्च २०१२ रोजीच्या सरकारच्या अध्यादेशामध्ये दुरुस्ती करण्यात आली असून गहू आणि तूर डाळीच्या आयातीवर १० टक्के आयात शुल्क लावण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे सध्या होत असलेल्या आयातीवर सुमारे ८४० कोटी रुपयांचा महसूल सरकारला मिळण्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.
भारतीय बाजारात गव्हाची उपलब्धता वाढवण्यासाठी तसेच किरकोळ बाजारातील दर कमी करण्यासाठी सरकारने आठ डिसेंबर २०१६ रोजी गव्हावरील १० टक्के आयात शुल्क रद्द केले होते. तूर डाळीवर आतापर्यंत कोणत्याच प्रकारचे शुल्क लावण्यात अालेले नव्हते.

गव्हाचे विक्रमी ९.७ कोटी टन उत्पादन : पीक वर्ष २०१६-१७ (जुलै ते जून) मध्ये चांगल्या मान्सूनमुळे गव्हाचे विक्रमी ९.७ कोटी टन उत्पादन होणार असल्याचे कृषी विभागाच्या दुसऱ्या अंदाजात नमूद करण्यात आले आहे. गेल्या वर्षी ९.३ कोटी टन उत्पादन झाले होते. याचप्रमाणे तूरडाळीचे उत्पादन ४२.३ लाख टन होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी देशात २५.६ लाख टन तुरीचे उत्पादन झाले होते. तुरीचे पीक खरीप हंगामात घेतले जाते.

देशातील साखर कारखान्यांकडे २८ फेब्रुवारीपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांची १२,२७० कोटी रुपयांची थकबाकी होती. खाद्य राज्यमंत्री सी. आर. चौधरी यांनी मंगळवारी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. भारतातील साखरेची मागणी पूर्ण करण्यासाठी देशात पुरेसा साठा असल्याचेही त्यांनी सांगितले.
दशकात सर्वाधिक गहू आयात : आयटीसी
दुष्काळामुळे गहू साठ्यात घट झाली असून त्यामुळे मागणी पूर्ण करण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात गहू आयात करावा लागणार आहे. त्यामुळे भारत एका दशकात सर्वाधिक गहू आयात करणारा देश बनण्याची शक्यता असल्याचा दावा देशातील सर्वात मोठी गहू खरेदी करणारी कंपनी आयटीसीने केला आहे.
कंपनीच्या कृषी व्यवसाय विभागाचे सीईओ एस. शिवकुमार यांनी सांगितले की, “२०१७-१८ मध्ये देशातील गहू आयात ३० लाख टनांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ही एका दशकातील दुसरी सर्वाधिक पातळी आहे. मार्च महिन्यापर्यंत गेल्या वर्षीच्या गव्हाच्या साठ्याच्या तुलनेत यंदाचा साठा ४४ टक्के कमी होऊन ९४.३ लाख टन राहण्याचा अंदाज आहे. जगात भारत सर्वात मोठा दुसरा गहू आयात करणारा देश आहे.

शेतकऱ्यांना मिळेल चांगली किंमत
सरकारच्या या निर्णयामुळे भारतीय बाजारात गहू आणि तूर डाळीच्या किमतीत होत असलेल्या घसरणीवर नियंत्रण मिळवण्यात मदत मिळेल. यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा असल्याने शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल. मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमधील गव्हाचे नवे पीक सध्या बाजार समित्यांमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
खाद्य तेलाच्या निर्यातीला मंजुरी
नवी दिल्ली- सरकारने सोमवारी प्रमुख खाद्य तेलांच्या निर्यातीला मंजुरी दिली आहे. देशातून शेंगदाणा तेल, तीळ तेल, सोयाबीन तेल आणि मका तेलाच्या घाऊक निर्यातीवर गेल्या ९ वर्षांपासून बंद होती. भारतात यंदा तेलबिया उत्पादनात वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचा दावा सरकारच्या वतीने करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे भारतीय बाजारातील तेलबियांच्या खरेदीला तसेच खाद्य तेलाच्या किमतीला मदत मिळण्याचीही शक्यता आहे. सध्या देशात दरवर्षी सुमारे २.४ कोटी टन खाद्य तेलाची मागणी असते. मात्र, यातील सुमारे ६० टक्के मागणी आयात तेलाच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. गेल्या वर्षी नोव्हेंबर ते ऑक्टोबरदरम्यान १.४५ कोटी लिटर खाद्य तेल आयात झाले.

Next Article

Recommended