आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेलंगणाचा प्रस्‍ताव 20 दिवसांत कॅबिनेटपुढे मांडणारः सुशीलकुमार शिंदे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- तेलंगणा राज्‍य निर्मितीचा मुद्दा 20 दिवसांमध्‍ये केंद्रीय कॅबिनेटसमोर मांडण्‍यात येईल, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली .आहे. दरम्‍यान, गोंधळ घालून संसदेच्‍या कामकाजात वारंवार अडथळा निर्माण करणा-या खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्‍यात आली आहे. लोकसभा अध्‍यक्ष मीरा कुमार यांनी तेलगू देसम पार्टीचे 4 आणि कॉंग्रेसच्‍या 5 खासदारांना 5 दिवसांसाठी निलंबित केले आहे. हे सर्व खासदार आंध्र प्रदेशचे आहेत. याशिवाय राज्‍यसभेतही तेलगू देसप पार्टीच्‍या 2 सदस्‍यांना दिवसभरासाठी निलंबित करण्‍यात आले. तेलंगणाच्‍या मुद्यावरुन या खासदारांनी सभागृहांत वारंवार गोंधळ घातला होता.

सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले, की तेलंगणासंदर्भात कॅबिनेटमध्‍ये ठराव मंजूर करण्‍यात येणार आहे. ठराव तयार केल्‍यानंतर कायदा मंत्रालयाकडे आढावा घेण्‍यासाठी पाठविण्‍यात येईल. त्‍यानंतर तो कॅबिनेटमध्‍ये मांडण्‍यात येईल. हे सर्व 20 दिवसांच्‍या आत होण्‍याची अपेक्षा आहे.

कॅबिनेटची मंजूरी मिळाल्‍यानंतर यासंदर्भात मंत्रिगट स्‍थापन करण्‍यात येईल. आंध्र प्रदेशच्‍या विभागणीनंतर निर्माण होणा-या परिस्थितीचा मंत्रिगटातर्फे आढावा घेण्‍यात येईल.

लोकसभेत आज कामकाज सुरु होताच आंध्र प्रदेशमधील कॉंग्रेस आणि तेलगू देसम पार्टीच्‍या खासदारांनी गोंधळ घातला. त्‍यामुळे त्‍यांना निलंबित करण्‍यात आले. तसेच कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्‍यात आले. राज्‍यसभेचेही कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्‍यात आले होते.

राज्‍यसभेत पेट्रोल आणि डिझेलच्‍या दरवाढीवरुन गदारोळ झाला. सरकारने शनिवारी मध्‍यरात्रीपासून पेट्रोलचे दर 2.35 रुपयांनी आणि डिझेलचे दर 50 पैशांनी वाढविले. संसदेचे अधिवेशन सुरु असताना सभागृहाबाहेर दरवाढ जाहीर करण्‍यात आली. या मुद्यावर चर्चा व्‍हायला पाहिजे, अशी मागणी तृणमूल कॉंग्रेसचे सदस्‍य डेरेक ओब्रायन यांनी राज्‍यसभेत केली. त्‍यांना डावे पक्ष आणि भाजपच्‍या सदस्‍यांनी पाठींबा दिला. परंतु, याविषयावर शून्‍य तासात चर्चा ठेवण्‍यात आली आहे, असे सांगून सभापतींनी मागणी फेटाळली. त्‍यानंतरही सदस्‍यांनी मागणी लावून धरल्‍यामुळे कामकाज तहकूब करण्‍यात आले.