नवी दिल्ली - या वर्षाच्या अखेरपर्यंत देशातील एक हजार गावे नव्या आणि आधुनिक प्रारंभ असलेल्या गावांमध्ये परिवर्तित होतील. ही डिजिटल गावे असतील. यात फक्त मोफत वायफाय सुविधा ग्रामीण लोकांसाठी उपलब्ध असेल, असे नाही तर इतर सुविधाही त्यांना मिळणार आहेत.
राजस्थान, मध्य प्रदेश आणि बिहारमधील १२ नमुना गावे तीन महिन्यांत वायफाय होतील.
केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, या वर्षीच्या अखेरीपर्यंत १००० गावे पूर्णपणे ई-गावात परिवर्तित होतील. यासाठी काम सुरू झाले आहे.
या एक हजार गावांत ई-चिकित्सा सेवेच्या माध्यमातून लोक प्रमुख शहरांतील तज्ज्ञ डाॅक्टरांशी सरळ संपर्कातून सल्ला मिळवू शकतील. त्यांना यासाठी मोठ्या शहरात जाण्याची गरज राहणार नाही. ई-शिक्षणाने गावातील प्रत्येक मुलाला पसंतीचा कोर्स उपलब्ध होईल. ते विविध विद्यापीठे- शिक्षण संस्थांचे कोर्स करू शकतील.
वेगवेगळी शैक्षणिक माहिती मिळवू शकतील. सेवा काही काळासाठी मोफत असू शकतात. तथापि, काही सेवांसाठी मात्र नाममात्र शुल्क द्यावे लागेल. हे काम खासगी क्षेत्रासह मिळून केले जाईल. एकदा हजार गावांना डिजिटल बनवल्यानंतर यांची संख्या वाढवली जाईल.