आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 13 Killed In Mount Everest Avalanche News In Divya Marathi

एव्हरेस्टवर 13 जणांचा हिमस्खलनामुळे मृत्यू; सात गिर्यारोहक अद्याप बेपत्ता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काठमांडू - जगातील सर्वात उंच गिरिशिखर एव्हरेस्टवर शुक्रवारी बर्फाचा अवाढव्य कडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत किमान 13 जण ठार, तर अनेक जखमी झाले. मृतांमध्ये नेपाळी शेर्पा, गाइड आणि गिर्यारोहकांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. शिखराच्या इतिहासातील ही अलीकडची अत्यंत दुर्मिळ दुर्दैवी घटना आहे.

सकाळी पावणेसातच्या सुमारास ही घटना घडली. सुमारे 5 हजार 800 मीटर उंचीवर हिमस्खलन झाले. त्याला पॉपकॉर्न फील्ड असे म्हटले जाते. घटनास्थळाहून सायंकाळपर्यंत 13 मृतदेह बाहेर काढण्यात आले, अशी माहिती नेपाळचा गिर्यारोहण विभाग आणि पर्यटन मंत्रालयाकडून देण्यात आली. हिमस्खलनात जखमी झालेल्या तीन जखमी गिर्यारोहकांवर काठमांडू येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सात गिर्यारोहक अद्याप बेपत्ता असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. एव्हरेस्टच्या पर्यटन छावणीपासून निघाल्यानंतर अचानक बर्फाचे भलेमोठे तुकडे पर्यटक, गाइड यांच्या अंगावर कोसळले. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला, असे गिर्यारोहण विभागाचे अधिकारी तिलक पांडे यांनी सांगितले. दरम्यान, हजारो मीटर उंचीवर हिमालयीन रेस्क्यू असोसिएशन, नेपाळ लष्कर, पोलिस यांच्याकडून संयुक्त बचाव मोहीम राबवण्यात आली आहे. नेपाळ ट्रेकिंग असोसिएशनचाही त्यात सहभाग आहे. 1996 मध्ये झालेल्या हिमस्खलनात 15 जणांचा मृत्यू झाला होता. 2006 मधील दुर्घटनेत 12 गिर्यारोहकांचा समावेश होता.

नेमके काय घडले?
शुक्रवारी भल्या सकाळीच स्थानिक गाइड मंडळी गिर्यारोहणाच्या तयारीला लागली होती. गिर्यारोहणासाठी गाइडनी दोरखंड निश्चित केले. मोहिमेतील गिर्यारोहकांसाठी मार्ग ठरवण्यात आला. त्यानंतर चढाईची तयारी पूर्ण झाली. त्याच वेळी ही बर्फाचे अजस्र तुकडे अंगावर कोसळले. अनेक गिर्यारोहक, गाइड त्याखाली चिरडले गेले.

15 जण होते मोहिमेवर
गिर्यारोहण मोहिमेत सुमारे 15 गिर्यारोहकांचा समावेश होता. गिर्यारोहणासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात आली होती. त्यात वेगवेगळ्या संघटनेतील सहा सदस्यांचा समावेश होता.

बर्फाखाली गाइड दबले
दुर्घटनेत बर्फाखाली सुमारे 100 शेर्पा गाइड दबले गेल्याचे सांगण्यात आले. परदेशी पर्यटकांना मार्गदर्शनासाठी शेर्पाची भूमिका महत्त्वाची ठरते.

आणखी काही बेपत्ता
काही बेपत्ता गिर्यारोहकांचे प्राण वाचवण्यात यश आले, परंतु अद्यापही आणखी बेपत्ता असल्याचे बचाव पथकाने सांगितले.

ऐन हंगामात दुर्घटना
जगभरातील गिर्यारोहकांना एव्हरेस्टचे नेहमीच आकर्षण असते. एप्रिल आणि मेमध्ये तर गिर्यारोहणाचा मोसम असतो. शेकडो गिर्यारोहकांमुळे शिखराच्या पायथ्याचे रूपांतर जणू निवासी छावण्यांमध्ये झाल्याचे पाहायला मिळते. याच काळात ही दुर्घटना घडली आहे. आगामी दोन महिन्यांत 334 परदेशी गिर्यारोहकांचा समावेश असलेली मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमा यशस्वी करण्यासाठी 400 शेर्पांची मदत घेतली जाणार आहे. मोहिमेत सहभागी होऊन शिखर गाठणार्‍यांची संख्या गेल्या काही वर्षांत चांगलीच वाढली आहे. 2004 मध्ये 300 हून अधिक गिर्यारोहकांना शिखर गाठण्यात यश आले होते. 2012 मध्ये 500 गिर्यारोहक यशस्वी झाले होते.