आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इसिसचे 14 जण जेरबंद, महाराष्‍ट्रासह चार राज्‍यांत एनआयएची कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ मुंबई - प्रजासत्ताक दिन तोंडावर आलेला असतानाच राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए), शुक्रवारी देशव्यापी छापासत्र टाकून इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया म्हणजेच इसिस या दहशतवादी संघटनेच्या स्वयंघोषित ‘आमिर’सह १४ समर्थकांना पकडले. या संशयितांपैकी ६ जणांना अटक झाली असून इतर ८ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
एनआयने गुरुवारी, शुक्रवारी राज्यांची पोलिस दले आणि राष्ट्रीय सुरक्षा संस्थांच्या समन्वयाने ही कारवाई केली. काही दिवसांपूर्वी बंगळुरू येथील मौलाना अझर शाह या मदरसा शिक्षकाला एनआयने अटक केल्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या १४ जणांनी इसिससारखीच दहशतवादी विचारसरणी असलेल्या ‘जनूद- उल- खलिफा- ए- हिंद’ ही दहशतवादी संघटना स्थापन केली आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगण आणि उत्तर प्रदेशात एकाच वेळी छापे टाकण्यात आले. कर्नाटकातून सहा जण जेरबंद करण्यात आले. त्यापैकी चारजण अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे ड्रॉप आऊट विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येते. याशिवाय हैदराबादेतून चार आणि उत्तर प्रदेशातून दोन जण ताब्यात घेण्यात आला. या संघटनेवर काही परदेशी नागरिकांसह देशातील विविध ठिकाणी हल्ले घडवून आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती, असे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. या चारही राज्यांतील पोलिसांच्या समन्वयाने राष्ट्रीय सुरक्षा संस्थांनी हे छापासत्र टाकले. अटक करण्यात आलेल्या सर्व इसिस समर्थकांना नवी दिल्लीत नेण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीत ‘जनूद- उल- खलिफा- ए- हिंद’ या संघटनेची रचना दहशतवादी संघटनेसारखीच असल्याचे निष्पन्न झाले असून राजधानीत त्यांची तपशीलवार चौकशी केली जाणार आहे.
फ्रान्सच्या अध्यक्षांच्या दौऱ्याचे निमित्त...
फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँक होलांदे हे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे असून या कार्यक्रमात घातपाती कारवाईची शक्यता असल्याबाबत फ्रान्स दुतावासाला एक निनावी पत्र आल्यानंतर केंद्रीय स्तरावरून त्वरीत कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या. या कारवाईनंतर देशभरात सर्वत्र हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
जनूदचा स्वयंघोषित ‘आमिर’ अटक
ठाण्यातील मुंब्रा येथील रहिवासी मुदब्बीर मुश्ताक हा जनूदचा स्वयंघोषित ‘आमिर’ आहे. महाराष्ट्र एटीएस आणि एनआयएने त्याला अटक केली. आणखी एकाला ताब्यात घेतले आहे. अटक झालेल्यांत महंमद नसीम खान व महंमद शरीफ मोइनुद्दीन खान (हैदराबाद), नजमूल हुडा (मंगलोर), महंमद अफझल (बंगळुरू) यांचा समावेश आहे.
भाजप नेते हुसेन यांना इसिसचे धमकीपत्र
भाजप नेते शहानवाज हुसेन यांना इसिसचे धमकीचे पत्र मिळाले. या पत्रात भाजपच्या अन्य आठ नेत्यांबाबत अभद्र बाबींचा उल्लेख आहे. हुसेन यांनी त्याची पोलिसांत तक्रार दिली आहे. अशा धमक्यांना मी भीक घालत नाही, भारतातच इसिसची कबर खोदू, असे हुसेन म्हणाले.
टॅक्सी गायब, चालकाचा मृतदेह मिळाला : पठाणकोट हल्ल्यावेळी तीन अज्ञात व्यक्तींनी एक टॅक्सी भाड्याने घेतली होती. बुधवारी त्या टॅक्सीचा चालक विजयकुमारचा मृतदेह हिमाचल प्रदेशातील कांगडामध्ये मिळाला. टॅक्सीचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही.