आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाऊदची 15 हजार कोटींची संपत्ती सौदी अरबमध्ये जप्त, भारताच्या माहितीवर सर्वात मोठी कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मुंबई बॉम्बस्फोट मालिकेचा सूत्रधार व कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमविरुद्ध भारत सरकारने आजवरची सर्वात मोठी कारवाई केली आहे. संयुक्त अरब अमिरातीतील (यूएई) दाऊदची १५ हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केल्याचे सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातम्यांत म्हटले आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी संपत्ती जप्तीची कारवाई करण्याचे आवाहन यूएई सरकारला केले होते.

भारत सरकारने यूएई सरकारला दाऊद इब्राहिमशी संबंधित डोजियर सुपूर्द केले होते.  गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएईच्या दौऱ्यावर गेले होते, तेव्हा त्यांच्यासोबत डोभालही होते. दोन्ही देशांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावर माहितीचे आदान-प्रदान केले होते. दाऊदविरुद्ध कारवाई करण्यासाठी भारत सरकारने यूएई सरकारकडे आग्रह धरला होता. त्यामुळे यूएई सरकारने ही कारवाई केल्याचे सांगितले जाते. १९९३ मध्ये मंुबईत झालेल्या १२ बॉम्बस्फोटांच्या मालिकेत २२७ लोकांचा बळी गेला होता.

गोपनीय यादीवर झाली कारवाई
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी यूएई सरकारला दाऊदच्या संपत्तीबाबतची गोपनीय यादीच दिली होती. त्या यादीची खातरजमा केल्यानंतर यूएई सरकारने ही कारवाई केली.

दाऊदची दुबईत ‘गोल्डन बॉक्स’
दाऊदचा छोटा भाऊ अनिस इब्राहिम हा दुबईत गोल्डन बॉक्स नावाची कंपनी चालवतो, अशी गोपनीय माहिती भारताने यूएई सरकारला दिली होती. जप्त संपत्तीत गोल्डन बॉक्सचाही समावेश असल्याचे सांगितले जाते.

शेअर्स, बड्या कंपन्यांत पैसा 
दुबई व संयुक्त अरब अमिरातीतील आघाडीच्या कंपन्या व शेअर्समध्ये दाऊदची कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक आहे. पाकिस्तानमध्ये आश्रयाला राहून दाऊद आपले आर्थिक साम्राज्य सांभाळत असतो.

१० देशांत आर्थिक साम्राज्य
दुबईशिवाय दाऊदची मोरोक्को, स्पेन, संयुक्त अरब अमिरात, सिंगापूर, थायलंड, सायप्रस, तुर्की, भारत, पाकिस्तान व ब्रिटनमध्येही मोठी गुंतवणूक असल्याचे सांगितले जाते.

भारतात आणण्याचे प्रयत्न
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्याबाबतची माहिती सार्वजनिक करता येऊ शकत नाही, असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले.
बातम्या आणखी आहेत...